99व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
100 वे नाट्य संमेलन नागपुरातच घेण्याची तयारी
By Sanjay Patil--नागपूर : विदर्भाची भूमी ही नाट्य परंपरेला दाद देणारी असून, साहित्य, संस्कार, विचार या सर्वच बाबतीत समृद्ध आहे. सहिष्णूता हा आमचा विचार आहे. संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. भारतीय संविधानाने समतेचा विचार दिला असून, शासन भारतीय संविधानावरच चालत आहे. तसेच भारतीय संविधानाच्या चौकटीतच राहून कामकाज करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे 99 वे संमेलन रेशीमबाग येथील मैदानावर आयोजित करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाट्य संमेलनाला भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. कै. पुरुषोत्तम दारव्हेकर खुल्या रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, मावळत्या अध्यक्षा श्रीमती किर्ती शिलेदार, गिरीश गांधी, प्रसाद कांबळी, प्रफुल्ल फरकसे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, मावळत्या अध्यक्षा श्रीमती किर्ती शिलेदार तसेच अ. भा. नाट्य परिषदेच्या विविध पदाधिकाऱ्यांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री बोलताना म्हणाले की, 34 वर्षांनंतर नागपुरात नाट्य संमेलन होत असल्याचा आनंद होत असून, 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. नाट्य परिषदेने 100 वे संमेलनसुद्धा नागपूर येथे आयोजित करण्यास तयारी असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. महाराष्ट्राची रंगभूमी आणि नाट्यपरंपरा ही देशातील अत्यंत समृद्ध परंपरा आहे. देशात ही नाट्य परंपरा मराठी रंगभूमीने जोपासली आहे. ती वाखाणण्याजोगी आहे. अनेक वेळा कालानुसार काही परंपरा लुप्त होतात. काही कला तेवढ्या वेगाने पुढे जात नाहीत. त्याला पोषक वातावरण नसते. मात्र मराठी रंगभूममी व रसिकांनी कुठेही कमी न होऊ देता ती अधिक समृद्ध केली आणि विकसीत केली. त्याबद्दल त्यांनी मराठी नाट्य परंपरा व रसिकांचे आभार मानले.
विदर्भभूमीने नेहमीच नाट्यपरंपरेला दाद दिली असून, नाट्य परंपरा अडचणीत आली त्या प्रत्येक वेळी विदर्भभूमीने भरभरुन प्रेम दिले आहे. त्यामुळे नाट्य परंपरा, नाट्यकर्मींना विवंचनेतून बाहेर काढण्याचे काम या भूमीने केल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, वैदर्भीयांची भूक अजूनही तशीच असल्याचा आनंद आहे. त्यातही झाडीपट्टीची बातच न्यारी असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजही झाडीपट्टीची परंपरा ही भौतिकच नाही तर साहित्यिक, संस्कृती आणि विचारानेही समृद्धी जोपासत ही विदर्भाची भूमी समृद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
हल्ली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा होत आहे. आणि ती झालीही पाहिजे. देशाच्या रक्तातच सहिष्णूता आहे. आणि ती आजही तितकीच शाबूत असली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या देशावर जेवढी आक्रमणे झाली त्यांना या संस्कृतीने पचवले आहे. जगाच्या पाठीवर ज्यांना ज्यांना हाकलले त्या सर्व स्थलांतरीतांना स्थान देणारी आपली संस्कृती असून, कोणीही काळजी न करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित नाट्यरसिकांना यावेळी दिला.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल चर्चा होत असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले की, सहिष्णूता हा विचार आहे. तो आमच्या रक्तात आहे. यासंदर्भात जेवढे आक्रमणे झाली ती आम्ही पचवलीत. यापूर्वी 1975 साली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाला असता देशवासीयांनी तो उलथवून टाकला. केवळ नक्षली साहित्य सापडले म्हणून कोणाविरुद्ध कारवाई करण्यात येणार नाही. परंतु, देशविरोधी कृत्याचे पुरावे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध संविधानाने दिलेल्या चौकटीत राहून निश्चितच कार्यवाही करण्यात येईल. यासंदर्भात कोणताही गैरसमज असू नये, हाच विचार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या आयोजनाबद्दल आयोजकांना धन्यवाद देताना पुलवामा घटनेचा उल्लेख करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानात जाणारे नद्यांचे पाणी अडविण्याची घेतलेली भूमिका योग्य आहे. भारतावर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करताना देशासाठी बलिदान देण्याची तयारी सर्वच भारतीयांमध्ये असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी हे आंबेडकरी विचारांचे पाईक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अ. भा. नाट्य परिषदेचे निमंत्रक नरेश गडेकर, मुख्य निमंत्रक व अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, अ. भा. नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ (प्रसाद) कांबळी, अशोक ढेरे, सुनील ढगे, जगन्नाथ चितळे, रघुवीर खेडकर, सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळातील नाट्य कलावंतांचा गौरव करण्यात आला.
नाट्य संमेलनाचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी आभार मानले.
0 comments: