Wednesday 1 May 2019

अधीक्षक कार्यालयाच्या टाकीत डेंग्यूच्या अळ्या

अधीक्षक कार्यालयाच्या टाकीत डेंग्यूच्या अळ्या


संजय पाटील द्व्वारा
नागपूर---शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) वैद्यकीय अधीक्षक कार्यालय आणि इतरत्र सुरू असलेल्या बांधकाम आणि डागडुजीमुळे कृत्रिम पाण्याच्या टाक्या तयार करण्यात आल्या. मात्र, तेथील पाण्याने तळ गाठला आहे. ही जागा डासांची उत्पत्तीस्थळे झाल्याने संपूर्ण परिसर कीटकजन्य आजारांच्या विळख्यात अडकण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याकडे मेडिकल प्रशासनासह महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी एडिस इजिप्ती या डासांमुळे होणाऱ्या डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले होते. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, नागपूर शहरात यावेळी ५६२ तर ग्रामीण भागात १०३ रुणांची नोंद झाली होती. मेडिकल परिसरातील वसतिगृहात राहणाऱ्या मेडिकलच्या एमबीबीएस या पदवीसह पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांसह एम्स आणि दंतच्या बऱ्याच विद्याार्थ्यांनाही डेंग्यूने ग्रासले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्यानंतर मेडिकलच्या काही भागात केलेल्या पाहणीत येथे डेंग्यूच्या अळ्या आढळल्या होत्या. फवारणी केल्यावर डेंग्यूचे रुग्ण कमी झाले होते. या घटनेची अद्यापही मेडिकलने दखल घेतलेली नाही. या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाक्यातच मोठ्या संख्येने डासांची उत्पत्ती झाली आहे. मेडिकल परिसरातील निर्माणाधीन इमारत परिसरात केलेल्या इतरही कृत्रिम टाकीत हीच स्थिती आहे. हे डास वाढून डॉक्टरांसह रुग्णांना डेंग्यू, मलेरियासह इतर कीटकजन्य आजार झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मेडिकलमध्ये रोज बाह्यरुग्ण विभागात उपचाराला येणारे सुमारे तीन हजार रुग्ण, दोन हजारावर खाटांवरील रुग्णांसह वर्ग एक ते चारपर्यंतचे कायम व कंत्राटी कर्मचारी अशी सुमारे २० ते २५ हजार नागरिकांची रेलचेल येथे असते. यांनाही या आजाराचा धोका आहे.