Sunday 10 March 2019

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SHARE
By Sanjay Patil-- Nagpur---

ओव्हल मैदानजवळील डॉ.आंबेडकर पुतळ्यासमोर अखंड भीमज्योतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन





मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसांच्या जीवनात प्रकाशज्योत प्रज्ज्वलित करून अंधकारमय जीवन प्रकाशमय केले. तोच प्रकाश भीमज्योतीच्या माध्यमातून हे सरकार देत आहे. डॉ.आंबेडकर यांची विविध माध्यमातून सेवा करण्याचे भाग्य लाभले, लंडन येथील घर असो की इंदू मिल येथील स्मारक असो, सर्व अडचणी दूर करून काम सुरू आहे. इंदू मिल येथील डॉ.आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सामाजिक न्याय विभाग व मुंबई महापालिकेच्या वतीने ओव्हल मैदानाजवळील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अखंड भीमज्योत प्रज्ज्वलन व उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार राज पुरोहित, प्रसाद लाड, भाई गिरकर, कॅप्टन तमिल सेल्वन आदींसह डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.



मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, ही ज्योत नसून समतेचा मंत्र आहे, ही समता शेवटच्या व्यक्तीपर्यंत जेव्हा जाईल तेव्हा देश विकसित होईल. डॉ.आंबेडकर यांनी देशाला सर्वोत्तम संविधान दिले, या माध्यमातून समतेचा मार्ग दाखविला. संविधानाच्या अनुरूप सरकार काम करीत आहे, यापासून तसूभरही मागे हटणार नाही. संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीचा विकास हेच ध्येय असल्याचंही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांनी शौर्य, विरता व समतेचा मार्ग दाखविला, त्याच मार्गावरून हे सरकार मार्गक्रमण करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रथमत: मुख्यमंत्री श्री.फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुतळ्यासमोर उभारलेल्या अखंड भीमज्योतीचे उद्घाटन बटन दाबून मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: