Thursday 7 March 2019

जगातील पहिल्या दहा विकसित शहरात नागपूरचा समावेश- देवेंद्र फडणवीस

SHARE


विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ
टायगर कॅपिटलसोबत पर्यटनाची राजधानी म्हणून विकास
पायाभूत सुविधांसोबत रोजगार निर्मितीला प्राधान्य

By Sanjay Patil---नागपूर :
 नागपूरसह विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून मेट्रो, मिहान, एम्स् आदी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर शहराचा चेहरा बदलत आहे. जगातील वेगाने विकसित होणाऱ्या दहा शहरांमध्ये नागपूरचा समावेश झाला आहे. पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे नागपूर शहर हे आंतरराष्ट्रीय शहर झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर शहरातील सुमारे २४ विविध विकासकामांचे ई-भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. फुटाळा तलावाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, डॉ.मिलिंद माने, समीर मेघे, कृष्णा खोपडे, प्रा.अनिल सोले, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, महानगर आयुक्त श्रीमती शीतल उगले, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, एनएचएआयचे सीजीएम मनोजकुमार, आर. के. पांडे, दक्षिण-मध्य रेल्वेच्या डीआरएम श्रीमती शोभना बंडोपाध्याय, मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेष कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता व्ही. डी. सरदेशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ‘मी खासदार’ या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विकासकामासंदर्भातील सिडीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या विविध विकासकामांवर आधारीत विकासपुस्तिकेचे विमोचनही यावेळी करण्यात आले. गणेश टेकडी देवस्थानतर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीस 21 लाख रुपयांचा धनादेश यावेळी सुपुर्द करण्यात आला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नागपूर शहरात मागील चार वर्षांपासून विविध विकासकामे होत असल्याने शहराचा चेहरा-मोहरा बदलतो आहे. नागपूर शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणून विकसित होत आहे. नागपूरचे आणि अजनीचे रेल्वे स्टेशन आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि आधुनिक स्वरुपाचे होत आहे. रेल्वे स्टेशनवर एस्केलेटर यासारख्या विविध सुविधा प्रवाशांसाठी उभारल्या जात आहे. अजनी रेल्वे स्टेशन हे मल्टीमॉडेल रेल्वे स्टेशनच्या स्वरुपात विकसित करण्यात येत आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार असून प्रवाशांना सुविधा होणार आहे. नागपूर शहरातील रस्त्यांची, उद्यानाची तसेच खेळाच्या मैदानांच्या विकासाची कामे साकारली आहेत. फुटाळा तलाव व अंबाझरी तलावाच्या सुशोभिकरणाची कामे पथदर्शी स्वरुपाची ठरणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत नक्कीच वाढ होणार आहे. याद्वारे नागपूर पर्यटन राजधानी म्हणूनही विकसित होऊ शकते.
विविध विकासकामे साकारत असतानाच रोजगार निर्मितीवरही भर देण्यात येत आहे. मिहानच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात तर विविध विकासकामांच्या माध्यमातून सेवा क्षेत्रात रोजगार संधी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा सर्वेक्षणानुसार 2035 मध्ये वेगाने विकसित होणाऱ्या जगातील पहिल्या दहा विकसित शहरांमध्ये नागपूर शहराचा समावेश असणार आहे. रस्ते विकास आणि सौर ऊर्जा प्रकल्पांसाठीही भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पायाभूत सुविधांचा विकासाबरोबरच समाजातील गरजू स्तरातील व्यक्तींना घरकुलेही उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गरीब रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जनसामान्यांचे जीवनमान बदलण्यावर भर देण्यात येत असून सर्वंकष विकास साधतानांच विकासाला मानवी चेहरा प्राप्त करुन दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विदर्भातील विविध विकासकामांसाठीही भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग भरीव निधी उपलब्ध करुन साकारण्यात येत आहे. हा नागपूर व विदर्भाच्या समृद्धीचा महामार्ग ठरणार आहे. विदर्भात उद्योगांसाठी सर्वात कमी वीजदर आहेत. विदर्भातील औद्योगिक क्षेत्राला याद्वारे चालना मिळणार आहे. याद्वारे रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

श्री.गडकरी म्हणाले, नागपूर शहरात विविध विकासकामे साकारली आहेत. अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. शहराचा व परिसराचा चौफेर विकास होतो आहे. अजनी रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येत असून हे जगातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्टेशन ठरेल. सीएनजीवर धावणाऱ्या बसेस, वैशिष्ट्यपूर्ण मेट्रो, सौर ऊर्जा प्रकल्प, वीज निर्मितीसाठी सांडपाण्याचा उपयोग यासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प नागपूर शहरात साकारले जात आहेत. मध्य नागपूर शहरातील रस्त्यांची कामेही वेगात सुरु आहेत. आयआयएम व अन्य शैक्षणिक संस्था यांच्या उभारणीद्वारे येथील रोजगार निर्मितीलाही चालना मिळत आहे. मैदानांच्या विकासाद्वारे क्रीडा क्षेत्राचा तसेच शेतकऱ्यांसाठी कन्व्हेंशन सेंटरची उभारणी याद्वारे कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.बावनकुळे म्हणाले, नागपूर शहरात विविध विकासकामे साकारत असल्याने शहराचा चेहरा-मोहरा बदलत असून शहराची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण झाली आहे. नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारत आहे. नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेजमध्ये रुपांतरीत करण्यात येत आहे. यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ‘आयआयएम’सारख्या नामवंत शैक्षणिक संस्था नागपूर येथे सुरु होत आहे. नागपूर हे क्रीडा व संस्कृती संवर्धन करणारे शहर म्हणूनही ओळखले जात आहे. दीक्षाभूमी, ताजबाग व ड्रॅगन पॅलेस यासारख्या ठिकाणांच्या विकासासाठीही निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शहरात रिंगरोड, मेट्रो तसेच वीज पुरवठा क्षेत्रातील कामेही वेगात सुरु आहेत. अमृत योजनेअंतर्गत शहरातील विविध विकासकामे पूर्ण होत आहे. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या निधीतही भरीव वाढ झालेली असल्याचे त्यांनी सांगितले.

सूत्रसंचालन श्रीमती रेणुका देशकर यांनी केले तर आमदार सुधाकर देशमुख यांनी आभार मानले.


विकास प्रकल्पांचा ई- भूमिपूजनाद्वारे शुभारंभ
  • नागपूर-नागभीड ब्रॉडगेज रेल्वेलाईन, नागपूर-नागभीड रेल्वेलाईन
  • नागपूर रेल्वे स्टेशनवरील विविध विकासकामे
  • अजनी रेल्वे स्टेशन येथील एक्सेलेटर व इतर विकास कामांचे भूमीपूजन
  • अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्प टप्पा-1 व सामंजस्य करारावर स्वाक्षरी
  • सीआयआरटी उपकेंद्र व एएसआरटीयू सेंटर अंतर्गत आयडीटीआर, गोधनी
  • नागपूर शहरातील केंद्रीय मार्ग निधीच्या विविध विकासकामे
  • नागपूर महानगरपालिकेअंतर्गत विविध विकासकामे
  • नागपूर महानगर विकास प्राधिकरण अंतर्गत विविध विकासकामे
  • फुटाळा तलाव संगीत कारंजे
  • ‘मी खासदार’ सीडीचे विमोचन
  • अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित पुस्तिकेचे विमोचन
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: