संजय पाटील : राज्यातील शिवसेना- भाजप युती नेमकी कशामुळे तुटली, कोणी कोणास फसविले याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर गुरुवारी विधानसभेत पूर्णविराम मिळाला. होय, आम्ही शिवसेनेला फसविले. कधी ना कधी आम्ही ही चूक सुधारू, अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी युतीत कोणी कोणाला फसविले याची स्पष्ट कबुली दिली.
आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच असे सांगत काँग्रेस- राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा दिला.
लोकसभा निवडणुकीत युती करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या युतीबाबत आणि मुख्यमंत्रिपदाबाबतही चर्चा झाली होती. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षात दावे-प्रतिदावे सुरू झाले. मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे देण्याचा शब्द भाजप नेत्यांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरे वारंवार करीत होते, तर मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे देण्याचा शब्द दिला नव्हता असे सांगत फडणवीस यांनी शिवसेनेला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला होता.
मुख्यमंत्रिपदावरून युती तुटल्यानंतरही दोन्ही पक्ष एकमेकांवर फसवणुकीचा आरोप करीत होते. मात्र अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याचा खुलासा केला.
भाकीत.. आम्ही शिवसेनेला फसविले, पण तुम्ही याचा एवढा गैरफायदा घेऊ नका असे त्यांनी राष्ट्रवादी- काँग्रेसला सुनावले. एवढेच नव्हे तर तुमचे तीन महिन्यापासूनचे संबंध असून आमचे ३० वर्षांचे संबंध असून महाविकास आघाडी सरकारचे आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या सरकारचे १०० अपराध पूर्ण झाल्यानंतर हे सरकार कोसळेल, असे भाकीतही त्यांनी यावेळी वर्तविले.
0 comments: