Monday, 20 April 2020

५३ पत्रकार, छायाचित्रकार करोनाबाधित : संजय पाटील

SHARE
Image may contain: 4 people, including Sanjay PatilImage may contain: Sanjay Patil

पत्रकार प्रतीक्षा नगरमधील ज्या इमारतीत राहत होते ती इमारत प्रतिबंधित करण्यात आली आहे.

संजय पाटील : मुंबई : डॉक्टर, पोलीस, बेस्ट कर्मचाऱ्यांपाठोपाठ शहरात ठिकठिकाणी, रुग्णालयांत, वस्त्यांमध्ये वार्ताकनासाठी फिरणाऱ्या ५३ वार्ताहर आणि वृत्तछायाचित्रकारांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. यात इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा समावेश आहे. यापैकी पाच पत्रकार प्रतीक्षा नगरमधील ज्या इमारतीत राहत होते ती इमारत प्रतिबंधित करण्यात आली आहे.
मुंबईतील पत्रकारांकरिता महापालिकेने १६ आणि १७ एप्रिलला दोन दिवसीय तपासणी शिबीर आयोजित केले होते. त्यात १७१ पत्रकारांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ५३ जणांना संसर्ग असल्याचे स्पष्ट झाले. यात मोठय़ा प्रमाणावर छायाचित्रकारांचा समावेश आहे. सोमवारी हे अहवाल येताच पत्रकारांमध्ये खळबळ उडाली. संसर्ग झालेल्या पत्रकारांना तातडीने घरातच अलगीकरण करून राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे रोज बातम्या देणारेच सोमवारी बातमीचा विषय झाले होते. दरम्यान, या सर्व पत्रकारांमध्ये कोणतीच लक्षणे दिसत नसून सर्वाची प्रकृती स्थिर आहे. मात्र संसर्ग पसरू नये म्हणून या पत्रकारांनी विलगीकरण करण्याची मागणी केली आहे.
पत्रकारांची इमारत प्रतिबंधित
या पत्रकारांपैकी काही शीव येथील प्रतीक्षा नगरमध्ये राहतात. त्यामुळे ‘प्रेस एनक्लेव्ह आरंभ’ ही इमारत पालिकेने प्रतिबंधित केली आहे. तर यापैकी काही पत्रकार उपनगरात तर काही मुंबईबाहेर राहणारे आहेत. त्यापैकी काही पत्रकार आधीच कुटुंबापासून दूर राहून काम करत होते.
रुग्ण वाढण्याची शक्यता
या शिबिरात एकूण १७१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १६७ जणांचे अहवाल आले असून त्यापैकी ५३ जणांना लागण झाली आहे. उर्वरित पत्रकारांच्या चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
पत्रकारांना संसर्ग झाल्यामुळे त्यांना गेल्या काही दिवसांत भेटलेल्या राजकारणी, लोकप्रतिनिधींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
धारावीत करोनाबाधितांची संख्या १६८ वर
करोनावाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे धारावीमधील परिस्थिती चिंताजनक बनू लागली आहे. धारावीत आणखी ३० जणांना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले असून करोनाबाधितांची संख्या १६८ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईमधील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. धारावीमधील डॉ. बालिगा नगरमध्ये पहिला करोनाचा रुग्ण सापडला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली. धारावीमध्ये मोठय़ा प्रमाणावर नागरिकांची तपासणी करण्यात येत असून दररोज नवे करोनाबाधित सापडू लागले आहेत. सोमवारी ३० नवे रुग्ण सापडले असून धारावीतील करोनाबाधितांची एकूण संख्या १६९ झाली आहे. तर करोनामुळे आतापर्यंत ११ जणांचा बळी गेला आहे.
महापौरांचे घरातच विलगीकरण
याच चाचणी शिबिरात महापौर किशोरी पेडणेकर यांचीही चाचणी करण्यात आली होती. त्यांना संसर्ग नसल्याचे निष्पन्न झाले असले तरी बाधित पत्रकारांच्या सान्निध्यात आल्यामुळे त्यांनी घरातच आपले विलगीकरण केले आहे. घरातूनच कामकाज पाहत असल्याचे महापौरांनी सांगितले. संसर्ग झालेल्या पत्रकारांचे गोरेगावमध्ये एकाच ठिकाणी विलगीकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महापौरांनी दिली.



SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: