लॉकडाऊनमुळे मजुरांची अभूतपूर्व अशी कुचंबणा झाली असून घराच्या ओढीने हैदराबादमधून गोंदियाच्या दिशेने पायी निघालेल्या एका मजुराची शोकांतिका समोर आली आहे. तब्बल ३५० किलोमीटर पायी चालल्यानंतर या मजुराने आपली जीवनयात्रा संपवल्याने सारेच हळहळले आहेत. |
संजय पाटील : वर्धा : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर सर्वाधिक भरडला गेला तो मजूर. मजुरांच्या हातचा रोजगार गेला आणि त्यांच्यासाठी सारेच रस्ते लॉक झाले. कोसोदूर असलेल्या गावच्या मार्गावर अडचणींचे पहाड उभे राहिले. त्यातून अनेक मजुरांनी घरच्या ओढीने पायपीट सुरू केली. ही पायपीट अनकांच्या जीवावर बेतली. यात गोंदियातील मजुराचेही नाव जोडले गेले आहे. हैदराबाद येथून पायी निघालेल्या गोंदिया येथील बांधकाम मजुराच्या वाट्याला या प्रवासाने आत्महत्या दिली. हैदराबाद ते गिरड असा ३५० किलोमीटरचा प्रवास करून देखील हताश आणि निराश झालेल्या या मजुराची पायपीट गळफासाने संपली. हे सारेच मन सून्न करून टाकणारे आहे.
गोंदिया येथील अमरसिंह मडावी (४० वर्षे) या मजुराच्या बाबतीत ही शोकांतिका घडली आहे.
हैदराबाद येथे बांधकामाच्या साइटवर काम करणाऱ्या अमरसिंहला अचानक काम थांबल्यामुळे काही सुचेनासे झाले. पुढे काम सुरू होईल या प्रतीक्षेत त्याचे चार दिवस निघाले. पण, काम सुरू होण्याची शक्यता धुसर झाल्याने चार दिवसांनंतर त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला. जायला कुठलीही गाडी नाही किंवा दुसरं साधन नव्हतं. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या मजुराने आणि त्याने पायी जाण्याचे ठरविले. दोघांचा पायी प्रवास सुरू झाला. वाट तुडवत दोघांनी साडेतीनशे किलोमीटर चालत वर्ध्यातील गिरड गाठले. गिरडच्या आधी वाटेत एका ट्रकचा आधार दोघांना मिळाला. ट्रकमध्ये आणखीही मजूर होते. दरम्यान, नाश्त्यासाठी ट्रक वाटेत थांबला. यावेळी लघुशंकेसाठी अमरसिंह गेला असता ट्रक त्याला तिथेच सोडून मार्गस्थ झाला. जागा अनोळखी असल्याने व एकटाच असल्याने अमरसिंह हताश झाला. त्यातून त्याने तिथे जवळ असलेल्या शेतात कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अशी पटली ओळख...
नागपूर-वर्धा सीमेवर गिरड परिसरात अजय झाडे या शेतकऱ्याच्या शेतात एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. शेतात कडुलिंबाच्या झाडाला लटकलेला मृतदेह गिरड पोलिसांनी ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, मृतदेहाजवळ आढळलेल्या मोबाइलने काम सोपे केले. पोलिसांनी मोबाइल चार्ज करून त्याच्या कुटुंबाचे संपर्क क्रमांक मिळविले आणि त्याचा पत्ता शोधून काढला. त्यात हा इसम गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील चिल्लारी येथील असल्याचे व त्याचे नाव अमरसिंह मडावी असल्याचे स्पष्ट झाले. दीड महिन्यापूर्वी हैदराबाद येथे बांधकामाच्या कामासाठी तो गेला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याच्या हातचे काम गेले आणि जीवही गेला. उपासमार, बेकारी, निराशा यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्याला गिरडचे ठाणेदार महेंद्र सूर्यवंशी यांनीही दुजोरा दिला आहे.
0 comments: