संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : 24 जून 2020 : नगर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी परिसरातील शेतकऱ्याच्या शेतातून माती व मुरुमाची चोरी केल्याप्रकरणी कंत्राटदार कंपनी गायत्री कन्स्ट्रक्शन्स विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतमालक बाहेरगावी राहत असल्याचा गैरफायदा घेऊन मातीची चोरी केली. हा प्रकार उघडकीस आल्यावर नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र, फसवणूकच झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.
नोकरीनिमित्त पुण्यात राहणारे दीपक मुनोत यांची देर्डे चांदवड (ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) येथे शेतजमीन आहे. कंपनीने त्यांच्या शेतात विनापरवाना खोदकाम करून सुमारे ५४ लाख घनफूट माती आणि मुरूम चोरून नेल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलास ठाण्यात मंगळवारी दाखल झाला. मुनोत यांच्या मालकीची एकत्रित ३ एकर १५ गुंठे जमीन आहे. या परिसरात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. गायत्री कन्स्ट्रक्शन्स कंपनीचे चेअरमन, कार्यकारी संचालक, व्यवस्थापकीय संचालक, प्रकल्प प्रमुख ताता राव, पितांबर जेना यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी, जेसीबी चालक यांनी संगनमताने शेतामध्ये बेकायदा प्रवेश करून सुमारे ४० फूट खोल खोदकाम करून माती तसेच मुरूम चोरून नेली. शेतातील विहीर बुजविण्यात आली. पिकांची नासधूस झाली असून यापुढे शेती पिके घेण्यास उपयुक्त राहिली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार त्यांच्याविरूद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१९ मध्ये घडला. याची माहिती मिळाल्यावर मुनोत यांनी गायत्री कन्स्ट्रक्शन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून, फोनवरून वारंवार विचारणा केली. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी चूक मान्य करून नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शविली होती. नंतर मात्र, कंपनीने उडवाउडवीची उत्तरे दिली. नुकसान भरपाईबाबतही शब्द देऊन सातत्याने टाळाटाळ केली. त्यामुळे शेवटी मुनोत यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मुनोत यांनी डिसेंबर २०१९ मध्येच पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप आहे. पाठपुरावा केल्यानंतर अखेर सहा महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 comments: