संजय पाटील : नागपूर मीडिया प्रेस : 7 जुलै 2020 : नाशिक: अभिनेता अक्षय कुमार यांच्या नाशिक येथील हेलिकॉप्टर दौऱ्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. राज्यातील मुख्यमंत्र्यासह एकाही मंत्र्याला हेलिकॉप्टरची सुविधा मिळत नसताना अक्षय कुमारला नाशिक जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी सुविधा कशी दिली याची चौकशी होणार आहे.
अक्षय कुमार हा चार दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील एका खासगी रिसॉर्टवर आला होता. त्यासाठी अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला विशेष परवानगी देण्यात आली होती. अक्षय कुमारने त्रंबकेश्वरजवळील एका रिसॉर्टवर मुक्काम केला होता. राज्यातील मंत्र्यांना व्हीआयपी सुविधा मिळत नसताना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुविधेवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
'नियम डावलून अक्षय कुमारला व्हीआयपी ट्रीटमेंटचा हा प्रकार धक्कादायक आहे. ग्रामीण भाग असताना अक्षय कुमारला शहर पोलिसांचा एस्कॉर्ट कसा?, याबद्दलही भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळं सध्या अनेक गोष्टींवर निर्बंध आहेत. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनाही आपापल्या गाड्यांनी दौरे करावे लागत आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईला यायचे होते. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी विशेष विमानाची परवानागी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली होती. त्यामुळं त्यांना आजारी अवस्थेत १२ तासांचा प्रवास करून अॅम्बुलन्सने मुंबईला यावे लागले होते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारला हेलिकॉप्टर कसे मिळाले आणि नाशिक जिल्ह्यात त्याला परवानगी कशी मिळाली,' असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
करोना रुग्णांसाठी नाशिक येथील ठक्कर डोममध्ये करण्यात आलेल्या व्यवस्थेचीही छगन भुजबळ यांनी आज पाहणी केली. शहरांतील रुग्णालयांत जागा शिल्लक आहेत. मात्र, आपत्कालीन परिस्थितीसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
0 comments: