संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : 10 जुलै 2020 : नागपूर : अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत वितरित केला जाणारा तांदूळ निकृष्ट दर्जाचा असल्याचे अलीकडेच नाशिक येथे आढळून आले होते. शासन चांगल्या दर्जाचा तांदूळ खरेदी करीत असताना त्याचा दर्जा असा कसा बदलतो, असे प्रश्न यातून उपस्थित झाले होते. आता यातले गौडबंगाल उघड झाले असून शासकीय गोदामातून भरडाईसाठी भातगिरणीत गेल्यावर तेथे हे धान्यबदल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, या प्रकरणातील दोषींना वाचण्याचा प्रयत्न होत असल्याचे संथ चौकशीतून दिसून येत येत आहे.
राज्य सरकार (अन्न व नागरी पुरवठा खाते) आदिवासी विभाग आणि बाजार समित्यांमार्फत (मार्केटिंग फेडरेशन) शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करते. ते धान्य शासकीय गोदामात जमा केले जाते. या धान्याची भरडाई स्थानिक भातगिरणीत केली जाते. गोदामातून भरडाईसाठी भातगिरणीमध्ये धान्य नेताना ते बदलेले जाते. शासकीय गोदामातील उत्तम प्रतीचे धान्य दुसरीकडे वळते केले जाते आणि भातगिरणी मालकाने स्वस्त दरात निकृष्ट दर्जाचे खरेदी केलेल्या धान्याची भरडाई केली जाते. नंतर ते तांदूळ शासकीय गोदामात पाठवले जाते. यामुळे निकृष्ट दर्जाचे तांदूळ शासकीय गोदामात दिसून येते. गोदामातून भरडाईसाठी धान्य पोहचवण्याची आणि भरडाई झाल्यानंतर तांदूळ गोदामात आणण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते सर्व अधिकारी यासाठी जबाबदार आहेत. या प्रकारात भातगिरणी मालक आणि या प्रकरणाकडे कानाडोळा करणारे संबंधित अधिकारीही दोषी आहेत. अशाप्रकारच्या तांदळाचा गेली अनेक वर्षे पुरवठा केला जात आहे. निकृष्ट दर्जाच्या तांदळाचे प्रकार लपवण्यासाठी अनेक गोदामात पावसाचे पाणी गळेल अशी व्यवस्था केली जाते किंवा ट्रक पावसाच्या पाण्यात भिजवले जातात.
अलीकडे नाशिक येथे निकृष्ट दर्जाचा तांदूळ आढळला होता. हा तांदूळ गडचिरोलीहून नागपूरला आणि नागपूहून नाशिकला पाठवण्यात आला होता. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात शासनाकडून धान्य खरेदी केली जाते. त्याची भरडाई करून संपूर्ण राज्यात अन्न व नागरी पुरवठा खात्यामार्फत वितरित केले जाते. निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा प्रकरणी नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निलंबनाचे आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांनी दिले होते. परंतु अद्यापतरी त्यात काही झालेले नाही. तसेच भातगिरणी मालकांच्या साखळीविरुद्ध सरकारने अद्याप कठोर भूमिका घेतलेली नाही. दरम्यान, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी याप्रकरणी आपल्याला चौकशीचे आदेश नसल्याचे सांगितले.
‘‘गडचिरोली जिल्ह्य़ातील ८५ खरेदी केंद्राहून धान्य भरडाईसाठी येते. भरडाई केल्यानंतर धान्य शासकीय गोदामात पोहचवले जाते. त्यावेळी अधिकारी तांदूळ तपासून घेतात. भातगिरणी मालकांची जबाबदारी संपते. गोदामातून तांदूळ राज्यभर नेताना काय होते, हे बघण्याची जबाबदारी वाहतूकदार आणि पुरवठादार यांची आहे.’’
– पुरुषोत्तम डेंगानी, अध्यक्ष, भातगिरणी असोसिएशन, गडचिरोली.
निकृष्ट तांदळाच्या पुरवठय़ासाठी नाशिक, नागपूर आणि गडचिरोली कार्यालयांपैकी कोण जबाबदार आहे, याच्या चौकशीचे आदेश तेथील उपायुक्त (महसूल) यांना देण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होताच दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल.
-संजय खंडारे, सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग.
0 comments: