संजय पाटील : नागपूर मीडिया प्रेस : 7 जुलै 2020 : कोल्हापूर : बंद पडलेली मागासवर्गीय सहकारी औद्योगिक संस्था चालू करण्यासाठी २० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उद्योजक शितल आदिनाथ केटकाळे यांनी रजपुते यांच्याविरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी संस्था औद्योगिक वसाहतीचे रवी रजपुते हे संस्थापक अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपामध्ये प्रवेश केला होता. या बड्या राजकीय नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
इचलकरंजी येथील माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या माणगांववाडीमधील शाहुराजे मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था, होलार मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था आणि रवीचंद्र महीला मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था या संस्था सध्या बंद स्थितीत आहेत. या संस्था चालू करण्यासाठी रजपुते यांनी उद्योजक शितल आदिनाथ केटकाळे यांच्याकडून २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याची पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर शितल केटकाळे यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात रजपुते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा अधिक तपास डीवायएसपी प्रणिल गिल्डा करीत आहेत.
0 comments: