संजय पाटील : नागपूर : शहरात करोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या, वेळीवेळी साबणाने हात स्वच्छ धुवा, अशा सूचना सरकारने नागरिकांना केल्या आहेत. जिल्हा परिषदसुद्धा आपल्या स्तरावर याबाबत जनजागृती करीत आहेत. मात्र, जिल्हा परिषदेच्याच इमारतीत दिव्या खाली अंधार असल्याचे चित्र सोमवारी बघावयास मिळाले. एकीकडे स्वच्छ हात धुण्याचे आवाहन करण्यात येत असतानाच या इमारतीतील कर्मचाऱ्यांसाठीच्या स्वच्छतागृहांमध्ये साधे साबणाचे तुकडेही दिसून येत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रशासनाने वाऱ्यावर सोडले की काय, अशी चर्चा असून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
गेल्या आठवड्यात नागपुरात करोना व्हायरसने बाधित पहिला रुग्ण आढळून आला. त्यातच ही संख्या आता चारवर पोहोचली आहे. करोना व्हायरस हवेतून पसरत नाही. मात्र, तो कपड्यांवर तसेच काही ठिकाणी काही काळासाठी जिवंत राहू शकतो, असे दिसून आले आहे. त्यामुळे आपल्या हाताला हा व्हायरस लागू शकतो, याबाबत काळजी बाळगत नागरिकांनी आपले हात तोंडाला, नाकाला किंवा डोळ्याला लावणे टाळावे, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच हात स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त वेळा साबणाने हात धुवावेत. सॅनिटायजर वापरण्याची आवश्यकता नसून केवळ साबणाने २० ते ३० सेकंदांसाठी स्वच्छ हात धुवावेत म्हणजे करोनाचा व्हायरस नष्ट होऊ शकतो, अशा सूचना केंद्र व राज्य सरकारने दिल्या आहेत.
अनेक खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायजर, हॅण्डवॉश ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेतसुद्धा पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्वच विभाग प्रमुखांसाठीच्या स्वच्छतागृहांमध्ये हॅण्डवॉश ठेवण्यात आले आहेत. मात्र जिल्हा परिषदेतील अन्य स्वच्छतागृहांत सॅनिटायजर वा साबण ठेवले नसल्याचे सोमवारी दिसून आले. कर्मचारी व अभ्यागतांसाठीच्या स्वच्छतागृहांमध्ये साबणाचे साधे तुकडेसुद्धा नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांचे आरोग्य वाऱ्यावर सोडले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला केवळ समाज कल्याण विभाग अपवाद असल्याचे आढळून आले आहे. येथे हॅण्डवॉशची सुविधा केल्याचे दिसून आले. या विभागाने तर कर्मचाऱ्यांसाठीचे बायोमॅट्रिक काही दिवसांसाठी बंद केले आहेत.
...
सर्वच स्वच्छतागृहांमध्ये साबणाने हात धुण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच त्यांचे पालन केले जात आहे. मात्र, काही ठिकाणी साबण संपले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी तातडीने साबणाची व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत
0 comments: