Sunday, 22 March 2020

तुम्ही घरातच बसा : तुकाराम मुंढे :संजय पाटील

SHARE


संजय पाटील; नागपूर : सरकारने अनेकदा आवाहन करुनही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसतच आहेत. नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे या नागरिकांविरोधात अत्यंत आक्रमक झाले आहेत. संपूर्ण प्रशासन तुमच्यासाठी रस्त्यावर आहे, तुम्ही घरातच बसा, कृपा करुन मला बळाचा वापर करायला लावू नका, अशी विनंती करतच त्यांनी बेजबाबदार नागरिकांना इशाराही दिला आहे. लॉकडाऊनचा अर्थ समजून घ्या आणि घरात राहा, अन्यथा आम्हाला शेवटचं पाऊल उचलावंच लागेल, असा इशाराही तुकाराम मुंढे यांनी दिला.

'तुम्ही साथ दिली तर लॉकडाऊनची गरज पडली नसती. लॉकडाऊन म्हणजे जवळपास संचारबंदी लागू झालेली आहे. तरीही लोक अजून फिरताना दिसत आहेत. पुन्हा एकदा विनंती करतोय, कृपया लॉकडाऊनचा अर्थ समजून घ्या. स्वतः घरात राहणे असा याचा अर्थ होतो. हा आजार एकमेकांपासून होणार नाही हा याचा उद्देश आहे. जे घरात राहतील त्यांनाच याचा फायदा होणार आहे. तुमच्यासाठी सर्व प्रशासन रस्त्यावर उतरलं आहे. इतर सर्व कामं बाजूला ठेवून आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी काम करत आहोत. हे सर्व चालू असताना तुम्ही रस्त्यावर येत आहात. याचा दुष्परिणाम आपल्याच कुटुंबावर होईल, पुन्हा काहीही करता येणार नाही. गरज आहे ती वेळेत आणि वेळेतच सुरक्षा उपाय घेण्याची. घराच्या बाहेर न पडणे हा चांगला उपाय आहे. कायद्यानुसार सर्व आदेश जारी झाले आहेत, त्याची अंमलबजावणी होत आहे. मी स्वतः आणि पोलीस आयुक्त स्वतः सांगत आहेत, तरीही ऐकत नसाल तर सक्तीने तुम्हाला घरात बसावं लागेल. आम्हाला ही ताकद वापरायला लावू नका ही तुमच्याकडून अपेक्षा आहे. नागपूरच्या सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे, कृपा करुन घराच्या बाहेर पडू नका, अशी विनंती तुकाराम मुंढे यांनी केली.
'आमचं सर्व परिस्थितीवर लक्ष आहे, त्याचा आढावा घेतला जात आहे. या आढाव्यानुसार परिस्थिती नियंत्रणात आहे आणि तुम्ही सहकार्य केलं नाही तर ही परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाईल. सर्व वैद्यकीय अधिकारी, प्रशासन तुमच्यासाठी काम करत आहे, त्यांना साथ द्या. सक्तीने तुम्हाला डांबून ठेवण्याची वेळ येऊ देऊ नका. घराच्या बाहेर असाल, तर घरी जा आणि बाहेर पडू नका, असं ते म्हणाले. अजूनही सामुदायिक संसर्ग झालेला नाही आणि तो आपल्याला टाळायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

1 comment:

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागपूरसह देशभरातील व्यापारी वर्गाने बंद पाळला. यामध्ये देशातील साठ हजार मार्केट, चाळीस कोटी कामगार आणि सात कोटी किरकोळ व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

    रविवारी देशभरातील सुमारे साठ हजार वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठा बंद होत्या. तिथे कुठल्याही प्रकारचा व्यवहार झाला नाही. अखिल भारतीय किरकोळ व्यापारी संघाने यात सर्व व्यापारी संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशन, ऑल इंडिया हॉकर्स फेडरेशन, लघु उद्योग भारती, एमएसएमई डेव्हलपमेंट फोरम, ऑल इंडिया लेडीज एंटरप्रेनर्स असोसिएशन, ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेस, भारतीय किसान मंच आदी राष्ट्रीय संघटना सहभागी झाल्या होत्या. त्याशिवाय, एक कोटी ट्रान्स्पोर्टशी निगडित कामगार, चार कोटी हॉकर्स, दोन कोटी लघु उद्योगाशी संबंधित कामगार यांनी पूर्णपणे व्यापार बंद ठेवला.

    याबाबत अधिक सांगताना कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया म्हणाले, 'पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानुसार सर्व व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. करोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकारने ३१ मार्चपर्यंत देशात लॉकडाउन जाहीर करण्यात यावा. त्याशिवाय हा भयावह आजार थांबू शकणार नाही. लोकांसाठी अत्यावश्यक अश्या बाबी वगळता इतर सर्व व्यवहार बंद करायला हवेत. तरच करोनाचा प्रसार थांबू शकणार आहे.'

    ३१ मार्चला द्या मुदतवाढ

    जीएसटी, प्राप्तिकरचे रिटर्न, विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. देशाची आरोग्य व्यवस्था पाहता अर्थव्यवस्था ढासळत आहे. तेव्हा देशाची अर्थव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी ३१ मार्चला मुदतवाढ देण्याची गरज आहे. ३० जूनपर्यंत जीएसटी, प्राप्तिकर याचे रिटर्न, विवरण पत्र भरण्याची मुभा देण्यात यावी. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी घेतलेले कर्ज आणि त्यापोटी भरावे लागणारे मासिक हफ्ते यांनादेखील ३० जूनपर्यंत सवलत मिळणे आवश्यक होऊन बसले आहे. सद्यस्थितीत सर्व व्यापार ठप्प असल्याने व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा स्थितीत आर्थिक कर्ज भरणे जवळपास अशक्यप्राय आहे. याकडे सरकारने लक्ष देत व्यापाऱ्यांना मुदतवाढीचा दिलासा द्यावा, अशी मागणी कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी केली आहे.

    ReplyDelete