Sunday, 15 March 2020

"दीक्षादूत" बाबासाहेबांचे सहकारी सदानंद फुलझेले यांचं निधन: संजय पाटील : Sadanand Fulzele passes away

SHARE

संजय पाटीलनागपूर: दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे मुख्य कार्यवाह व नागपूर शहराचे माजी उपमहापौर सदानंद फुलझेले यांचे रविवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. रविवारी सकाळी ९.३० वाजता घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात अशोक, अॅड. आनंद, डॉ. सुधीर ही तीन मुले व मुलगी नीमा ओरके तसेच मोठा आप्तपरिवार आहे. वर्षभरापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. सोमवारी दुपारी तीन वाजता त्यांचे पार्थिव दीक्षाभूमी येथे अंत्यदर्शनासाठी दोन तास ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी दीक्षाभूमी येथे आपल्या लाखो अनुयायांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली होती. या सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी फुलझेले यांनी यशस्वीपणे पार पाडली होती. दीक्षाभूमीही त्यांच्याच नेतृत्वात आकारास आली. आंबेडकरी चळवळीचा 'दीक्षादूत' हरविला अशी शोकसंवेदना शहरात व्यक्त होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील ते एक मुख्य कार्यकर्ते होते. दीक्षाभूमीवर जून, १९६३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापन झाली. तेव्हा अध्यक्ष म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड तर, सचिव म्हणून फुलझेले यांची निवड झाली. तेव्हापासून आजतागायत ते समितीचे कार्यवाह, सचिव म्हणून जबाबदारी सांभाळीत होते. दीक्षाभूमीवरील धम्मचक्रप्रवर्तन दिनाचे सोहळे आजपर्यंत त्यांच्याच नेतृत्वात यशस्वीरीत्या पार पडले आहेत. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांची दीक्षाभूमीवरील घडामोडींकडे बारीक नजर असायची. नुकत्याच झालेल्या धम्मचक्रप्रवर्तनदिनालाही त्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. १ नोव्हेंबर, १९२८ रोजी एका श्रीमंत, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबात धरमपेठ भागात त्यांचा जन्म झाला. विद्यार्थीदशेपासूनच ते चळवळीत सक्रिय होते. समता सैनिक दल, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन तसेच सामाजिक चळवळ व राजकीय क्षेत्रात त्यांनी भाग घेतला. १९५२ मध्ये ते रामदासपेठ वॉर्डातून निवडणूक लढले. केवळ एका मताने ते विजयी झाले होते. त्यानंतर १९६५ मध्ये त्यांची नागपूर मनपाचे उपमहापौर म्हणून निवड झाली. याच काळात ते रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्षही होते. त्यांच्या कार्यकाळात दीक्षाभूमीवरील स्मारकाचे काम पूर्ण झाले. तसेच याच ठिकाणी यशस्वी असा शैक्षणिक क्षेत्राचा वटवृक्ष उभा राहिला. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील एक जाणते, सहृ्दयी व सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व हरविले आहे, या शब्दात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरांच्या धर्मांतर सोहळ्याची जबाबदारी सांभाळणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांचं आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्यामागे मुलगा अॅड. आनंद, डॉ. सुधीर आणि सूना-नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा मुलगा दक्षिण आफ्रिकेत असल्याने सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सदानंद फुलझेले हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. आज सकाळी ९.३० वाजता धरमपेठ येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. फुलझेले यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. फुलझेले नागपूरचे उपमहापौर होते. तसेच रामदासपढ वॉर्डाचे नगरसेवकही होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराच्या धम्मदीक्षा सोहळ्याचे ते आयोजक होते. तसचे दीक्षाभूमी स्मारक समितीचे ते सचिव होते.

बाबासाहेबांच्या सच्चा अनुयायास मुकलो: मुख्यमंत्री
फुलझेले यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाने दीक्षाभूमीसाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या आंबेडकरी चळवळीतील एका सच्च्या अनुयायास आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळयाची संपूर्ण जबाबदारी सांभाळलेले सदानंद फुलझेले हे त्या काळातल्या सगळ्या क्षणांचे साक्षीदार तर होतेच पण त्यांनी बाबासाहेबांसारख्या महान व्यक्तिमत्वाला साथ दिली, त्यांच्यासमवेत उभे राहिले. आयुष्याच्या शेवटपर्यंत फुलझेले यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कामात स्वत:ला झोकून दिले आणि आपल्या कार्याचा ठसा उमटविला, असं मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. आज दीक्षाभूमी येथे डॉ बाबासाहेबांचे चिरंतन भव्य स्मारक उभे आहे त्यामागे दादासाहेब गायकवाड, दादासाहेब गवई यांचे सोबत सदानंद फुलझेले यांचे नाव आवर्जून घेतलेच पाहिजे. समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांनी भरपूर शिकावे म्हणून त्यांनी केलेले भरीव कार्य निश्चितच स्मरणात राहील. सदानंद फुलझेले यांच्या रुपाने आंबेडकरी चळवळीतला एक मोठा दुवा आता आपल्यातून गेला आहे मात्र त्यांच्या कार्याचे विस्मरण होऊ न देणे हीच खरी श्रद्धांजली राहील अशा शोक भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आत्मिय व्यक्तिमत्व!
दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेलेजी यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील एका सच्च्या सेनानीला आपण सारे मुकलो आहोत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत त्यांनी काम केले आणि नंतर त्याच कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले, अशी भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

दीक्षाभूमीच्या उभारणीत त्यांचा वाटा मोलाचा. दीक्षाभूमी आणि फुलझेले हे एक समीकरणच बनले होते. धम्मचक्र प्रवर्तनदिन असो की अन्य कुठले आयोजन, संपूर्ण व्यवस्थेवर त्यांचे बारीक लक्ष असे. अगदी शेवटच्या माणसाची व्यवस्था स्वतः पाहिल्याशिवाय ते स्वस्थ बसत नसत. ते एक आत्मिय व्यक्तिमत्व होते, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

माझे वैयक्तिक नुकसान
सदानंद फुलझेले यांच्या निधनाने आंबेडकर चळवळीचेच नाही तर माझे वैयक्तिक मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला. महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत सदानंदजी यांचे फार मोठे योगदान होते. समाजातील शोषित-वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत धडपड केली. एक विधायक आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात आदर होता. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीचे व्यवस्थापन असो की नागपूरचे उपमहापौरपद, सदानंदजींनी आपल्या कार्यातून सगळ्यांपुढे आदर्श निर्माण केला, असं गडकरी म्हणाले.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

6 comments:

  1. Sadanand Fulzele, Secretary, Param Pujya Dr Babasaheb Ambedkar Smarak Samiti, Deekshabhoomi, passed away on Sunday at his Dharampeth residence at 8.30 am. He was 92. Fulzele had played a key role in organising the historic programme of Dhamma Diksha in 1956 when lakhs of people had converted to Buddhism under leadership of Dr Babasaheb Ambedkar. He was Chief Convenor of the programme and also Deputy Mayor of Nagpur Municipal Corporation (NMC). Post passing away of Dr Ambedkar it was decided to build his memorial in city and Fulzele was named Secretary of Param Pujya Dr Babasaheb Ambedkar Smarak Samiti in year 1963 and was at its helm till his death.

    ReplyDelete
  2. He remained in background and assiduously steered the Samiti while it shaped the memorial for Dr Ambedkar at Deekshabhoomi. Till date Fulzele oversaw organisation of all Dhamma Chakra Pravartan Din programmes at Deekshabhoomi. The funeral procession of Fulzele will start from his residence at Ambedkar Nagar, Dharampeth, on Monday at 3 pm. The mortal remains of Fulzele will be kept at Deekshabhoomi to enable people to pay their homage. Last rites will be held at Ambazari crematorium at 5 pm.

    Fulzele was born in rich a landlord family but in early life he suffered a jolt as his father passed away when he was just a child. His mother and elder brother influenced Fulzele as he was inclined towards social work since early youthful days. In 1942, he took lead in organising convention of Scheduled Caste Foundation and therefore for first time Fulzele came in contact with Dr Ambedkar.

    He completed his graduation from National College in Arts faculty. He was first elected to NMC in 1952 from Ramdaspeth ward and was asked to contest elections by Ramdas Fulzele and Vitthal Thul. In 1956, Fulzele was elected to the post of Deputy Mayor. In 1957, after foundation for Republican Party was laid, Fulzele took a plunge into active politics. He steered affairs of party in city under leadership of Padma Shri Dadasaheb Gaikwad and Barr Rajabhau Khobragade. Union Minister Nitin Gadkari visited residence of Fulzele in evening and condoled the family. He laid a wreath on mortal remains of Fulzele. Earlier, Mayor Sandip Joshi also paid tributes to Fulzele on behalf of Nagpurians.

    ReplyDelete
  3. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून, समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

    उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव म्हणून केलेलं काम सर्वांच्या स्मरणात राहील. नागपूर दीक्षाभूमीसाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी, सच्चे अनुयायी अशी त्यांची ओळख होती. सर्वसामान्य कुटूंबातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केले. संपूर्ण आयुष्य त्यांनी समाज हितासाठी वाहिलं. त्यांचे विचार, कार्य सदैव स्मरणात राहील.

    ReplyDelete
  4. ब्राह्मणवादी भूमिकेवर टीका करण्याचा अधिकार सर्वाना आहे. पण, जातीयवादी वक्तव्य करू नये. ब्राह्मण समाजाविषयीचे डॉ. नितीन राऊत यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांच्या अंत्यसंस्कारासाठी ते नागपुरात आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितीन राऊत हे मंत्री असल्याने त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती अशी खंत व्यक्त केली. राऊत यांचा रोष बहुतेक भाजपवर असावा. पण भाजपमध्ये सर्वच जातीधर्माचे लोक असून तिथे जातीभेदाला थारा नाही, असेही आठवले म्हणाले. बाबासाहेब ब्राह्मणांचे विरोधक नव्हते. त्यांनी स्वत: ब्राह्मण महिलेशी लग्न केले होते. माझी पत्नीही ब्राह्मण आहे. अशा विरोधामुळे ब्राह्मण आणि दलित समाजात दुरावा वाढतो. त्यामुळे जातिवाचक बोलणे चुकीचे आहे. ब्राह्मण समाजातील अनेकांनी दलित चळवळीला सहकार्य केले असे स्वत: बाबासाहेब म्हणायचे. अनेक ब्राह्मण लोक बाबासाहेबांसोबत होते. ब्राह्मण लोकांनी बाबासाहेबांची भूमिका मांडली आहे. त्यामुळे ब्राह्मणवादी भूमिकेला विरोध असावा पण असे जातीयवादी वक्तव्य करू नये. व्यक्तिगत जातीय टीका टाळावी असेही आठवले म्हणाले.



    सरकार नक्कीच पडणार

    महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर न्यायालयाने चोवीस तासात त्यांना बहुमत सिद्ध करायला लावले होते. मात्र, मध्यप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष हे काँग्रेसचे असल्यामुळे त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेसला अधिकचा वेळ दिल्याचा आरोप आठवले यांनी केला. आमच्यासोबत काँग्रेसचे २२ आमदार असून कमलनाथ सरकार नक्कीच पडणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर अन्याय झाला असल्याने त्यांनी बंड केले. राहुल आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे ते भाजपात आल्याचेही आठवले म्हणाले.

    महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होणार

    मध्यप्रदेशप्रमाणे छत्तीसगड, राजस्थान आणि झारखंड तसेच महाराष्ट्रातही राजकीय उलाथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत येऊन नव्याने सरकार बनवावे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या तालमीत घडले आहेत. मात्र, आज त्यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावात काम करण्याची नामुष्की ओढवली अशी टीका आठवले यांनी केली. यावेळी त्यांनी करोना संदर्भात अफवांवर विश्वास न ठेवता सामूहिक लढा द्यावा असे आवाहन केले. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. तो भारताच्या ताब्यात आल्यास दहशतवाद पूर्णपणे कमी होईल. लवकरच काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल, असेही ते म्हणाले.

    ReplyDelete
  5. अंबाझरीघाटावर अंत्यसंस्कार; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

    पवित्र दीक्षाभूमीच्या उभारणीत मोलाचा वाटा उचलणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे कार्यवाह सदानंद फुलझेले यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फुलझेले यांचे सुपूत्र अशोक, आनंद आणि सुधीर यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या लाखो बांधवांसह धम्मदीक्षा घेतली. या सोहळ्याप्रसंगी उपमहापौर असताना सदानंद फुलझेले यांनी कार्यकर्त्याची भूमिका निभावली. ते केवळ धम्मक्रांती सोहळ्याचे साक्षीदार नव्हते, तर या सोहळ्याच्या आयोजनातील सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने आज समाजाची हानी झाली. धम्मदीक्षा सोहळ्यानंतर साऱ्यांनी राजकारण स्वीकारले, परंतु रिपाइंत असतानाही फुलझेले यांनी बाबासाहेबांच्या धम्माला प्रथम महत्त्व दिले. असे हे धम्मदूत सदानंद फुलझेले अजातशत्रू होते', अशा भावना अंबाझरी स्मशानभूमीत आयोजित शोकसभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या.

    स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महापौर संदीप जोशी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार जोगेंद्र कवाडे, पोलिस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय, प्रा. अशोक गोडघाटे, प्रा. रणजित मेश्राम, आमदार प्रकाश गजभिये, अॅड. राजेंद्र पाटील, डॉ. भाऊ लोखंडे, माजी कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, डॉ. प्रदीप आगलावे, कैलास वारके, जय जवान-जय किसान आघाडीचे प्रशांत पवार, धरम पाटील, अॅड. विमलसूर्य चिमणकर, किशोर बेहाडे, जयदीप कवाडे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, माजी खासदार मुकूल वासनिक, खासदार श्रीनिवास पाटील, महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे शोकसंदेश प्राप्त झाल्याचे समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी सांगितले.

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, 'सदानंद फुलझेले हे दीक्षाभूमी नावाच्या करूणासागराचे महामंत्री होते. त्यांच्या दीक्षाभूमीच्या सेवेला मोल नाही', अशा भावना व्यक्त केल्या. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी, 'दीक्षाभूमीचे अस्तित्व सांभाळणारे सदानंद फुलझेले यांचे कार्य अजुनही नजरेत साठवून आहे. दीक्षाभूमीवर नजर केंद्रित झाली की, फुलझेले यांची धम्मसेवा दिसते', अशा शब्दांत फुलझेले यांच्याप्रतीच्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. डॉ. भाऊ लोखंडे म्हणाले, 'बाबासाहेबांच्या धम्मदीक्षा सोहळ्याचे नियोजन फुलझेले यांनी केले. कधीही मंत्रिपदासाठी हात पसरला नाही, त्यांनी आयुष्यभर दीक्षाभूमीची सेवा केली. परंतु, हा सारा ऐतिहासिक दस्ताऐवज त्यांनी शब्दबद्ध केला असता तर हा इतिहास चिरंतन झाला असता.' अॅड. विमलसूर्य चिमणकर यांनी, 'दीक्षासोहळा पूर्ण होईपर्यंत इमाने इतबारे बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेसाठी रक्ताचे पाणी करणारा हा कार्यकर्ता आजही दीक्षाभूमीवर निळ्या क्रांतीला अभिवादन करताना दिसतो', अशा भावना व्यक्त केल्या. आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी, 'फुलझेले यांनी बाबासाहेबांच्या स्वप्नातील शिक्षण संस्था उभारली. ते धम्मसेवा करणारे धम्मदूत आहेत', अशी भावना व्यक्त केली.

    प्रा. अशोक गोडघाटे, डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी अंबाझरी घाटावर फुलझेले यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या वंदना ग्रहणानंतर 'साधू... साधू... साधू...'च्या जयघोषात फुलझेले यांना अभिवादन करण्यात आले.

    डॉ. कमल गवई, स्मारक समितीचे सदस्य एन. आर. सुटे, माजी आमदार उपेंद्र शेंडे, इ. मो. नारनवरे, प्रा. धनराज डहाट, तक्षशीला वाघधरे, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, शिवदास वासे, प्रा. महेंद्रकुमार मेश्राम, का. रा. वालदेकर, दादाकांत धनविजय, थॉमस कांबळे, महेंद्र गायकवाड, नरेश वहाणे, सुरेश साखरे, चंद्रहास सुटे, मनपा सत्तापक्षनेते संदीप जाधव, राजन वाघमारे, प्रकाश कुंभे, नगरसेवक धर्मपाल मेश्राम, नितीन गजभिये, नागोराव जयकर, उत्तम शेवडे, अजय हटेवार, अमन कांबळे, अतुल खोब्रागडे, सुनील सारिपुत्त, अनुपम मेंढे, अविनाश कठाणे, राहुल मून, बाबा कोंबाडे, नाना मेंढे, अॅड. स्मिता कांबळे, विजय भैसारे, नगरसेवक संदीप सहारे यांच्यासह अमरावती येथून आलेले रामेश्‍वर अभ्यंकर, डॉ. प्रदीप दंदे, माजी नगरसेवक भूषण बनसोड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

    ReplyDelete
  6. ‘ऑगस्ट १९५६ सालची ती गोष्ट. एक तरूण कार्यकर्ता दिल्लीला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भेटला. लाखो अनुयायी येतील. बुद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत. पोरा, होईल का व्यवस्था? असा थेट प्रश्न त्या तरूणाला विचारण्यात आला. समोरून उत्तर आले....‘होय बाबा’ या दोन शब्दाने बाबासाहेबांना जिंकले आणि दीक्षाभूमीवर ऐतिहासिक अशा १४ ऑक्टोबर, १९५६ चा दीक्षासोहळा मोठया दिमाखात पार पडला.’ दिवंगत सदानंद फुलझेले हाच तो तरूण. मनपाचा २८ वर्षाचा तरूण उपमहापौर. या सोहळयाची कायम आठवण करून देणारे कोटयवधी बौद्धजण फुलझेले यांना कायम स्मरणात ठेवतील.

    फुलझेले यांच्या निधनाने दीक्षाभूमीचा सजग प्रहरी हरपला. वयाच्या ९२ व्या वर्षीही ते दीक्षाभूमीच्या कायम चिंतेत असायचे. सायंकाळी प्रकृती सांभाळून दीक्षाभूमीला गेल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. आज मात्र, त्यांच्या निधनाने दीक्षाभूमीचा संरक्षक कायमचा विसावला आहे. तहहयात दीक्षाभूमीच्या विस्तारासाठी आणि धम्मचक्र प्रवर्तनदिनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेची चिंता त्यांना असायची. एक भव्यदिव्य असे स्मारक व परिसराचा विकास व्हावा यासाठी ते आयुष्यभर आग्रही राहिले. यासाठीच त्यांनी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची तेव्हाचे खासदार व स्मारक समितीचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रा. सु. गवई, एन. आर. सुटे यांच्यासह भेट घेतली. त्यावेळीही त्यांनी दीक्षाभूमी शेजारी असलेल्या केंद्रीय कृषी अनुसंधानची जागा द्यावी असा आग्रह धरला. दीक्षाभूमीच्या समोर असलेल्या माता कचेरीची जागा द्यावी यासाठीही ते राज्य सरकारकडे कायम मागणी करीत होते. प्रत्येक वेळी त्यांना आश्वासन व ग्वाही मिळायची. परंतु, त्यांच्या जिवंत असेपर्यंत या दोन्ही जागा दीक्षाभूमीला मिळाल्या नाही. त्यांचे स्वप्न अपुरेच राहिले. केवळ भव्यदिव्य स्मारक पूर्ण झाले म्हणजे काम संपले असे नाही. तर, दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येक अनुयायाची राहायची व्यवस्था व्हावी, त्यांना कुठलीही अडचण होऊ नये याची त्यांना काळजी होती. त्यामुळेच ते या दोन जागेसाठी प्रत्येक धम्मचक्रप्रवर्तनदिनाच्या समारंभात आवर्जुन उल्लेख करायचे.

    धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आठवडयाभरापूर्वीच फुलझेले दीक्षाभूमीवर सक्रिय व्हायचे. दिवस उगवला की रात्री उशीरापर्यत ते दीक्षाभूमीवर कॉलेजात हजर राहात. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची माहिती घेत. काही आवश्यक सूचना करीत. त्यांची हजेरीच मुख्य सोहळयापर्यंत अनेकांना ऊर्जा द्यायची. दीक्षाभूमीच्या डोमचे सध्या काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. ते आकर्षक व लक्षणीय असावे याचा त्यांना ध्यास होता. अधूनमधून प्रकृती बरी नसतानाही ते यायचे. डोमच्या कामाची माहिती घ्यायचे. दीक्षाभूमीवर समाजाचे धार्मिक कार्यक्रम व्हावे, येथून जगभर बौद्ध विचाराचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी ते कायम कार्यरत राहिले. केवळ दीक्षाभूमीच नव्हे तर समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांना चळवळीत सन्मानाचे स्थान होते. आज हा सन्मान काळाने हिरावून नेल्याबद्दल समाजात पोरकेपणाची भावना निर्माण झाली आहे.

    ReplyDelete