Saturday, 7 March 2020

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत -'येस बँक घोटाळ्यास मोदी, शहा जबाबदार'- संजय पाटील

SHARE


 संजय पाटील: मुंबई: बँकांना कोट्यवधींचा चुना लावून नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या हे पळून गेले तो पैसाही या देशातील बहुसंख्य हिंदूंचाच होता. येस बँकेत १८ हजार २३८ कर्मचारी असून, यात सर्वच हिंदू असून, नोकरीही धोक्यात आली आहे. याला सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. येस बँकेवर निर्बंध घातल्याने महाराष्ट्रातील १०९ बँका अडचणीत आल्या असून यात विदर्भातील मध्यवर्ती बँकांसह काही सहकारी बँका तसेच पतसंस्थांच्या ठेवीही याच बँकेत होत्या. परंतु बडोदा महापालिकेच्या बडोदा स्मार्ट डेव्हलमेंट कंपनीचे २६५ कोटी रुपये येस बँकेवर निर्बंध घालण्याच्या एक दिवसाआधीच काढून घेण्यात आले. यातून मोदी, शहांना फक्त गुजरातचीच काळजी असल्याचे दिसते, असे सावंत म्हणाले.

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता असून, या महापालिकेचे ९०५ कोटी रु. येस बँकेत आहेत. मोदी शहांनी बडोदा महापालिकेसारखेच किमान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कानात जरी सांगितले असते तरी ते या संकटातून वाचले असते. पण गुजरात प्रेमापुढे त्यांना इतर कोणी दिसत नाही असेच म्हणावे लागते, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.

धर्माच्या नावाखाली देशात मतांचे जातीय ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदू खतरे में है असा नारा संघ परिवारातील भाजप व त्यांच्या संलग्न संघटनांकडून सतत दिली जात असला तरी मोदी यांच्या राज्यात हिंदूच धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाच्या बँकांमधील बहुसंख्य हिंदुचाच पैसा बँकांत सुरक्षित न राहिल्यामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होत असून, त्यास केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने शनिवारी मुंबईत केला आहे. येस बँकेवरील निर्बंधामुळे महाराष्ट्रातील १०९ बँका अडचणीत आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

येस बँकेवर रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे त्या बँकेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. याआधी पंजाब महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यामुळे काही गुंतवणूकदारांना प्राण गमवावे लागले. नोटबंदीच्या निर्णयामुळे करोडो लोक रस्त्यावर आले. यात जवळपास दीडशे लोकांचा जीव गेला. देशात आत्महत्या करणाऱ्या तरुण व शेतकरी आत्महत्यांमध्येही बहुसंख्य हिंदूच आहेत. आता तीच वेळ येस बँकेत पैसा असलेल्या लोकांवर आलेली आहे, अशी टीका प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

येस बँकेतील लोकांची गुंतवणूक धोक्यात आली परंतु या संकटाने हिंदूंच्या देवालाही सोडले नाही. पुरीच्या भगवान जगन्नाथ मंदिराचे विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये असलेले ५४५ कोटी रुपये एक महिन्याआधी याच येस बँकेत जमा करण्यात आले होते. ते पैसेही आता बुडीत झाल्यातच जमा आहे. यात भगवान जगन्नाथही संकटात आल्याचा दावा सावंत यांनी केला.


SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: