Monday, 25 May 2020

अभिजित बॅनर्जीं "सरकारला गरीबांच्या खात्यात रक्कम टाकण्याची आवश्यकता" : संजय पाटील

SHARE


संजय पाटील:  नागपूर प्रेस मीडिया : न्यूज एजन्सी:26 मे 2020 : करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्यानं अनेकांना त्याचा फटका बसला आहे. तर दुसरीकडे हातावर पोट असलेल्यांना मोठ्या प्रमाणात या संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारला थेट गरीबांच्या खात्यात रक्कम टाकण्याची आवश्यकता असल्याचं मत अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.

अभिजित बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी इस्टर डुफ्लो या जयपूरमधील ऑनलाइन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या होत्या. “करोनाच्या संकटकाळादरम्यान सरकारला प्रत्येक भारतीला किमान १ हजार रुपये त्वरित दिले पाहिजे. तसंच पुढील काही महिने सरकारनं ही रक्कम भारतीयांना दिली पाहिजे,” असं मत त्यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केलं. तसंच ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ ही योजनादेखील सरकारानं लवकरात लवकर लागू केली पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं.
‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेची स्तुती
“सरकारला युनिव्हर्सल अल्ट्रा बेसिक इन्कम तात्काळ लागू करण्याची आवश्यकता आहे. जनधन योजनादेखील याचाच एक भाग आहे,” असं डुफ्लो यांनी व्यक्त केलं. यावेळी अभिजित बॅनर्जी आणि इस्टर डुफ्लो यांनी सरकारच्या ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ या योजनेची स्तुती केली. तर ही योजना त्वरित लागू करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. तसंच जोपर्यंत लस तयार होत नाही तोवर करोनाचं संकट कायम राहणार असल्याचं मतही अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.
भारतीय अर्थव्यवस्थेपुढे १९९१ पेक्षाही अधिक कठिण संकट उभं राहू शकतं असं मत बॅनर्जी यांनी यापूर्वी व्यक्त केलं होतं. तसंच त्यांनी जीडीपीमध्येही मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे. सरकारला सद्यस्थितीत गरीबांच्या हाती पैसा कसा पोहोचवता येईल याबाबत विचार करायला हवा, असंही त्यांनी नमूद केलं.
खरेदीची क्षमता नाही
भारतात सध्या मागणीची मोठी समस्या आहे. लोकांच्या हाती सध्या पैसा नाही हे त्यामागील मोठं कारण आहे. त्यामुळेच लोकं काहीही खरेदी करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्यात उशिर करणं चुकीचं ठरू शकतं. लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत यासाठीच त्वरित आर्थिक मदतीची अधिक गरज असल्याचं त्यांनी यापूर्वी राहुल गांधी यांच्यासोबत केलेल्या चर्चेदरम्यान म्हटलं होतं.
मागणी वाढवण्यावर लक्ष देणं आवश्यक
अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी मागणी वाढवण्याची गरज आहे. मागणी तेव्हाच वाढेल जेव्हा लोकांमध्ये खरेदी करण्याची क्षमताही वाढेल. यासाठीच लोकांच्या हाती पैसा पोहोचवणं आवश्यक आहे. लोकांच्या हाती पैसा आला तरच ते खर्च करतील आणि खर्च केल्यानंच मागणी वाढेल, तसंच अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असंही बॅनर्जी म्हणाले.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: