नागपूर : संजय पाटील : विलगीकरणासाठी पाचपावलीत ठेवण्यात आलेल्या नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या पोलिस क्वॉर्टरमध्ये वीज आहे, पण दिवे नाहीत. उन्हाळा असताना पुरेसे पाणी प्यायला मिळत नाही. तर, दुपारी तीनच्या सुमारास निकृष्ट जेवण, तेही अत्यंत कमी प्रमाणात मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विलगीकरणात ठेवलेल्यांनी शुक्रवारी यासंदर्भात अनेकांकडे तक्रारी केल्या. परंतु, कुणीही या नागरिकांचे ऐकून घ्यायला तयार नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर नागरिकांनी गर्दी करून घोषणा दिल्या.
पाचपावली पोलिस क्वॉर्टरमध्ये ६५० जणांची क्षमता आहे. सध्या ६४२ जणांचे येथे व्यवस्था आहे. याच विलगीकरण सेंटरमध्ये एफ विंगमध्ये पार्वतीनगरातील मृत तरुणाचे कुटुंबीय व परिसरातील नागरिक आहेत. एका खोलीत चारजणांचा समावेश आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. येथे वीज नाही. इतर वापरासाठी पुरेसे पाणी नाही. पिण्याच्या पाण्यासाठी दिवसभरात एकच कॅन दिली जात आहे. पाणी पुरावे, यासाठी एकच ग्लास पाणी पिऊन वेळ मारून न्यावी लागत आहे. चहाचा दर्जाही योग्य नाही. तर, जेवण दुपारी तीन वाजता येते. त्यातही भात दोन घासांचाच असतो. जेवणही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार खुद्द पार्वतीनगरातील मृत तरुणाच्या भावाने केली आहे.
शुक्रवारी अडीचच्या सुमारास आलेल्या जेवणात जळालेल्या पोळ्या व भाजी होती. त्यामुळे येथील नागरिकांनी ओरड केली. काही खोल्यांमध्ये चार तर, काहींमध्ये दोघे आहेत. खोल्यांची स्वच्छताही करण्यात आली नाही, याबाबतचे व्हिडीओ सेंटरमधील नागरिक व्हायरल करीत आहेत. जेवण पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे नाव विचारल्यावर कुणीही सांगत नाही, असे येथे विलगीकरणात असलेल्या तरुणाने सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून समन्वयक असलेले उपजिल्हाधिकारी उमेश घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 'तक्रारीबाबत माहिती करून सांगतो', असे उत्तर दिले. मात्र, पुढे कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
ओळखीच्यांना चांगले जेवण
शुक्रवारी सकाळी कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाकडून या सेंटरमध्ये जेवण आले. ते चांगल्या प्रतीचे होते. परंतु, हे जेवण या सेंटरमधील परिचयाच्या व्यक्तींपर्यंत पोहोचते झाले. या नागरिकांना सॅनिटायजरही पुरेशा प्रमाणात देण्यात आले, असे सांगितले गेले.
सॅनिटायजऐवजी ब्लिचिंग पावडर
या क्वॉर्टरमध्ये इलेक्ट्रिक फीटिंग करण्यात आली. वीज सुरू आहे; परंतु दिवे नाहीत. काही खोल्यांमध्ये पंखेही नाहीत. त्यामुळे अनेकांना उकाड्यात दिवस घालवावा लागत आहे. काहींनी स्वत:हून दिव्याची सोय केली. बाथरूममध्ये पुरेसे पाणी मिळत नाही. तर, सॅनिटायजरऐवजी ब्लिचिंग पावडरसारखा पदार्थ हात धुवायला देण्यात येतो, अशीही माहिती देण्यात आली.
0 comments: