संजय पाटील : नागपूर : नागपुर प्रेस मीडिया : 19 मे 2020 : कोव्हिड-१९च्या पार्श्वभूमीवर 'आत्मनिर्भर भारत'साठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज म्हणजे खासगीकरणाचा डाव असून, जनतेची घोर निराश केली असल्याची टीका राज्याचे ऊर्जा व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. सर्वांत मोठे राज्य, देशाची आर्थिक राजधानी आणि बाजारपेठेचा विचार करून महाराष्ट्राला अधिकाधिक निधी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
पॅकेजमधून शेतकरी, गरीब, मजूर दुर्लक्षित ठेवण्यात आले. प्रत्यक्ष लाभापासून जनता वंचित राहणार आहेत. कॉर्पोरेट, आयुध निर्माणी कारखान्यांचे खासगीकरण, संरक्षण विभागात विदेशी गुंतवणुकीवर भर देण्यात आला आहे. प्रत्यक्षात सर्व घटकांना संभ्रमावस्थेतून बाहेर काढून कालबद्ध कार्यक्रम देण्याची आहे. देशाच्या ढासळलेल्या आर्थिक स्थितीवर मात करून प्रचलित व्यवस्थेचे आधुनिकीकरण गरजेचे असताना विशिष्ट गट व संस्थांना नजरेसमोर ठेवून खासगीकरणातून त्यांना लाभ मिळवून देण्याचा घाट तर नाही ना, अशी शंका येते. खासगीकरणाचा हा डाव असल्याने यास तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
वीज वितरणाबाबतही ग्राहकहित दिसत असले तरी, खासगीकरण व मुठभर लोकांना लाभ होईल, असे दिसते. कोळसा खाण, आयात धोरणावरून खासगीकरण होणार असून, त्याचाही परिणाम वीज ग्राहकांवर होईल. वाहतूक व्यवस्था, रेल्वे, रस्ते व तत्सम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कार्यक्रम आखावा. सर्वांना थेट लाभ द्यावा, बिनव्याजी व थेट बँकेत पैसे वळते करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे. पॅकेजचा इव्हेंट करू नये, तर प्रत्यक्ष काम करावे, असा खोचक सल्लाही नितीन राऊत यांनी दिला आहे.
0 comments: