संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : 11 जून 2020 : मुंबई : नागपूरदरम्यानचा प्रवास सात तासांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असलेल्या सुमारे ५६ हजार कोटी रुपये खर्चाच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शीघ्र संचार द्रुतगती (समृद्धी) महामार्गातील सर्व अडथळे दूर झाल्याने या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच राज्यात उद्योग केंद्राचे विकेंद्रीकरण होण्यासाठी नव्याने येणारे उद्योग समृद्धी महामार्गाला लागून उभे राहतील यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे निर्देशही त्यांनी राज्य रस्ते विकास महामंडळास दिले. भाजप सरकारच्या काळात प्रतिष्ठेचा करण्यात आलेला हा प्रकल्प पूर्ण करण्याकरिता महाविकास आघाडी सरकारने आता प्राधान्य दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून या महामार्गाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.
उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करा
राज्यात नवीन उद्योग आणताना त्याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे आहे. करोनाच्या निमित्ताने ज्या भागात उद्योगाचा पट्टा आहे तेथे लोकसंख्येची घनता जास्त असल्याची बाब समोर आली आहे. याच पट्टय़ात टाळेबंदी करावी लागल्याने त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे राज्यात नवीन उद्योग आणताना त्याचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्गाची उभारणी करताना ही बाब लक्षात घेऊन उद्योगनिहाय टापू करावेत. दळणवळणाची सुविधा करतानाच या उद्योगांना आवश्यक असणाऱ्या सुविधा त्याच भागात देता येतील अशी व्यवस्था करावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.
भौगोलिक परिस्थितीनुसार उद्योगनिहाय टापू करतानाच त्या भागाचा विकास करताना समृद्धी महामार्गावर ठरावीक अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे आदेशही या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. या महामार्गावर उद्योग, कृषी, पर्यटन यानुसार भौगोलिक परिस्थितीनुरूप विकास केंद्रांचे नियोजन करावे. वस्त्रोद्योगाला अधिक चालना मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. या महामार्गासाठी ८३११.१५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गामुळे १० जिल्हे थेट जोडणार असून २४ जिल्ह्य़ांचे रस्ते जोडले जाणार आहेत. त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे. जेएनपीटीसारखे बंदरदेखील जवळ येणार आहे. वेगवेगळ्या नोडमध्ये उद्योगांचे नियोजन सुरू असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
१ मुंबई-नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी दोन वर्षांत पूर्ण करण्याचे राज्य रस्ते विकास महामंळाचे नियोजन असून त्यानुसार आतापर्यंत या प्रकल्पाचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
२१२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्य़ांतील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे.
0 comments: