भंडारा : संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : भंडारा शहराला छेदून जाणारा राष्ट्रीय महामार्ग दुपदरी आहे. या महामार्गावरील जड वाहतुकीमुळे अपघात होऊन अनेकांचा जीव गेला. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी नवा बायपास मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याचे बांधकाम, भूसंपादन व अन्य कामांसाठी ७३८ कोटी ६७ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबई-कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग भंडारा शहरातून जातो. चार पदरी असलेला हा महामार्ग मुजबी ते पलाडीपर्यंत दुपदरी आहे. त्यामुळे सर्व जड व प्रवासी वाहतूक शहरातून होते. या मार्गावर जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारतीतील अनेक कार्यालये आहेत. या भागात कायम वर्दळ असते. पण, भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खासदार सुनील मेंढे यांनी ही समस्या शासन दरबारी लावून धरली. त्यांच्या पुढाकाराने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन बायपास रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. प्रकल्पाची सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली असून प्रस्तावित मार्ग शहापूर, बेलावरून वळण घेऊन तीर्थक्षेत्र कोरंभी येथे वैनगंगेवर नवीन पूल बांधून गिरोला, भिलेवाडा मार्गावर चार पदरी रस्त्याला मिळणार आहे. भूसंपादनासाठी सरकारतर्फे राजपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. या बायपासचे काम पूर्ण होताच सर्व प्रवासी व माल वाहतूक येथून वळवली जाईल.
या बायपासची लांबी १४ किलोमीटर असणार आहे. यासाठी ५६.८९ हेक्टर आर जमीन १३ गावांमधून संपादित करायची आहे. आजीमाबाद, बेला, भिलेवाडा, दवडीपार, दिघोरी, गिरोला, हंसापूर, खापा, कोरंभी, पलाडी, सालेबर्डी, सिरसघाट, उमरी येथील जमिनी संपादनाचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याच्या प्रत्यक्ष बांधकामाचा खर्च ६१८.७५ कोटी रुपये आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- बायपास रस्ता : सहा पदरी - अंतर : १४.८ किमी - उड्डाणपूल : ०१ - मोठे पूल : ०४
- लहान पूल : ०२ - भूमिगत रस्ते : ०२ - लहान वाहन भूमिगत रस्ते : ०६ - पूल : १५
- सर्व्हिस रोड : १७ किमी - लहान जंक्शन : ११ - बस थांबे : ०४
बायपास रस्त्यामुळे नागरिकांना जड वाहतुकीची समस्या जाणवणार नाही. अपघाताचे प्रमाण कमी होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली बायपास रस्त्याची मागणी आता पूर्ण होत आहे.
-सुनील मेंढे, खासदार
0 comments: