संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : मुंबई 15 जून 2020 : गेले दशकभर आपल्या अष्टपैलू अभिनयाचा ठसा त्याने मनोरंजनसृष्टीत उमटवला. अल्पकाळात बॉलिवूडमध्ये त्याने स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले. नेहमी हसतमुख असणारा हा गुणी अभिनेता म्हणजे सुशांतसिंह राजपूत. परंतु त्याने घेतलेली ही अकाली 'एग्झिट' सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सुशांतच्या निधनाने कलाविश्वावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे. त्याने रंगवलेल्या विविध भूमिकांच्या माध्यमातून तो कायमस्वरूपी सर्वांच्या स्मरणात नक्कीच राहणार आहे.
सुशांत मुळचा बिहारमधील पाटण्याचा. त्याचे कुटुंब बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातले. आईच्या निधनानंतर त्याने दिल्लीमध्ये शिक्षणासाठी येण्याचा निर्णय घेतला. दिल्लीमध्ये लहानाचा मोठा झालेला सुशांत 'ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झाम'मध्ये सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणारा सुशांत अभ्यासात हुशार होता. परंतु, त्याला कलाविश्वात स्वतःचं करिअर घडवण्याची विशेष इच्छा होती. इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्याने शिक्षण सोडून मनोरंजन विश्वात करिअर करायचे ठरवले. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना त्याने शामक दावरकडे नृत्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. २००६मध्ये ऑस्ट्रेलिया येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या उद्घाटनात त्याला ऐश्वर्या रायसोबत नृत्य करण्याची संधीही मिळाली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबाने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला.
२००८मध्ये 'किस देस मे मेरा दिल' नावाच्या मालिकेतून त्याची छोट्या पडद्यावर एण्ट्री झाली होती. परंतु, त्याच्या करिअरला प्रामुख्याने सुरुवात झाली ती २००९ मधील गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या निमित्ताने. 'मानव देशमुख' ही भूमिका साकारलेला सुशांत त्यावेळी मध्यमवर्गाला आपल्याच घरातील जबाबदार, हळवा मुलगा वाटला. या भूमिकेने त्याला टीव्हीविश्वात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. सुशांतसिंह राजपूत हे नाव घराघरात पोहोचले. 'जरा नचके दिखा' आणि 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमधून त्याने नृत्यकौशल्य सिद्ध केले.
मुंबईमध्ये नादिरा बब्बर यांच्यासोबत अभिनयक्षेत्रात काम करून एलन-अमीनकडून तो प्रशिक्षण घेत होता. त्याचदरम्यान एक नाटक पाहण्यासाठी एकता कपूर तेथे उपस्थित होती. एकताने सुशांतचे अभिनयकौशल्य हेरले आणि त्याचे नशीबच बदलले. निर्माती असलेल्या एकता कपूर हिने सुशांतला तिच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेत मुख्य अभिनेता म्हणून काम करण्याची संधी दिली. या मालिकेच्या निमित्ताने लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला सुशांत तिथेच रमला नाही. त्याला सिनेविश्वात करिअर घडवायचे होते व त्याने ते साध्यही केले. 'काय पो चे' या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. लेखक चेतन भगत यांच्या 'थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाइफ' या पुस्तकावर हा सिनेमा आधारित होता. या चित्रपटातील सुशांतच्या अभिनयाचे जाणकार, अभ्यासकांनीही कौतुक केले. त्यानंतर सुशांतने मागे वळून पाहिलेच नाही. 'शुद्ध देसी रोमान्स' या यशराज फिल्म्सच्या चित्रपटातही त्याने काम केले. 'डीटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' चित्रपटांमधून तो प्रेक्षकांसमोर आला; परंतु भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात धोनीची भूमिका साकारून त्याने खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाचे समीक्षकांनीही कौतुक केले, तसेच हा चित्रपट त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला. चित्रपटाला स्वबळावर शंभर प्लस कोटींची कमाई करून देणारा अभिनेता म्हणून सुशांतची एक वेगळी ओळख निर्माण झाली. माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी त्यावेळी सुशांतचा क्रिकेट आणि यष्टीरक्षणाचा सराव करून घेतला होता. त्यांच्यासारख्या खेळाडूकडून सुशांतच्या मेहनतीचे कौतुक झाले. भूमिकेचा सखोल अभ्यास करून ती साकारणारा कलाकार असे त्याचे कौतुक झाले.
टीव्ही आणि चित्रपटाच्या पडद्यावर तो जसा हसतमुख आणि उत्साही असायचा; तसाच तो प्रत्यक्ष आयुष्यातदेखील नेहमी हसतमुख असायचा असे त्याच्या जवळचे कलाकार सांगतात. 'पवित्र रिश्ता' मालिकेत काम करताना अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत त्याचे सूर जुळले. मात्र कालांतराने या नात्याला विसंवादाची झळ लागली अन् दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तसे स्पष्टकरणही त्याने माध्यमांना दिले होते. आघाडीच्या एका अभिनेत्रीशीही त्याचे नाव जोडले गेले होते. परंतु, ते प्रेमही असफल झाल्याच्या चर्चा होत्या.
छोट्या पडद्यापासून सुरू झालेला त्याचा प्रवास अगदी हेवा वाटेल असाच आहे. गेल्या काही वर्षात त्याने 'सोनचिडीया', 'केदारनाथ' या सिनेमात भूमिका केल्या होत्या. 'छिछोरे' हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. 'ड्राइव्ह' हा ओटीटीवर प्रदर्शित झालेला शेवटचा त्याचा शेवटचा चित्रपट. सुशांत गेल्या काही महिन्यांपासून तब्बल सात चित्रपटांवर काम करत होता. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांच्या मनात त्याचे 'पीके' सिनेमातील गाणे रेंगाळत आहे; ते म्हणजे 'चार कदम चल दो ना साथ मेरे'. सोबतच 'छिछोरे'मधील त्याची भूमिका आज सर्वांना आठवतेय. यात सुशांतचा मुलगा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मुलाला या नैराश्यातून बाहेर काढत आत्मविश्वास देण्याचे काम तो करतो. मात्र पडद्यावर साकारलेला हा प्रगल्भ 'बाप' सुशांतमध्येही मुरला असता, तर त्याच्याकडून आणखी दर्जेदार भूमिका नक्की बघता आली असती.
0 comments: