Friday, 19 June 2020

सहसंचालक हनुमंत नाझीरकर नगररचना विभागातील अधिकारी कचाट्यात ; संजय पाटील

SHARE
Maharashtra Anti Corruption Bureau | IndiaToday

संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया :  18 जून 2020 : अमरावती : राज्याच्या नगररचना विभागातील सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांनी दोन कोटी ८५ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्यांची पत्नी व दोन मुलांना देखील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी केले आहे. वर्ग एकच्या अधिकाऱ्याची कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे.


हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय ५३), पत्नी संगिता हनुमंत नाझीरकर (वय ४५), गीतांजली हनुमंत नाझीरकर (वय२३), भास्कर हनुमंत नाझीरकर (वय २३, राहणार सर्व, स्वप्नशील्प सोसायटी, कोथरुड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाझीरकर हे सध्या अमरावती येथे कार्यरत आहेत. मागील सहा ते सात महिन्यांपासून त्याच्याकडील बेहिशेबी मालमत्तेच्या बाबातीत उघड चौकशी सुरू होती. त्यांच्याविरुद्ध २३ जानेवारी १९८६ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यानच्या कालावधीतील उत्पन्नाचे परिक्षण करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी त्यांच्याकडे दोन कोटी ८५ लाख ३४ हजार २२३ रुपये इतकी बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. त्यात २००२ -२००३ मध्ये एक लाख ४४ हजार ७३७ रुपये, २०१५-१६ मध्ये दोन कोटी ४७ लाख २५ हजार ३४५ रुपये, २०१६ -१७ मध्ये ३५ लाख ५२ हजार ६३८ रुपये आणि २०१७ - १८ मध्ये एक लाख ११ हजार ५०३ रुपयांचा समावेश आहे. त्यांना या बेहिशेबी संपत्तीचे स्पष्टीकरण देण्याची संधी देण्यात आली होती. मात्र ते स्पष्ट करू शकले नाहीत. शेवटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात ही मालमत्ता त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन भष्ट्राचारातून मिळविली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सीमा मेंहदळे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील अधिक तपास करीत आहेत.

घरांची झाडाझडती सुरू


गुन्हा दाखल झाल्यानंतर नाझीरकर यांच्या पुण्यातील कोथरुडमधील स्वप्नशील सोसायटीतील घरी व इतर ठिकाणी असलेल्या मालमत्तेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी छापेमारी केली. त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे.

पुण्यात असतानाच अनेक तक्रारी


नाझीरकर हे पूर्वी पुण्यातील नगररचना कार्यालयात सहसंचालक म्हणून काम करत होते. त्यावेळी देखील त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची अमरावतीला बदली झाली होती. त्यानंतर एसीबीने चौकशी केल्यानंतर ही बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे, अशी माहिती एसीबीकडून देण्यात आली आहे.


SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: