संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : 17 जुलै 2020 : नागपूर: ब्रॅन्डेड खाद्यतेलाच्या डब्यात निकृष्ट प्रतीचे खाद्यतेल भरून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली. इतवारी येथील या खाद्यविक्रेत्याकडून १ लाख ३९ हजार ६४७ रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने शंकर ट्रेडिंग कंपनीवर छापा टाकून १ लाख ३९ हजार ६४७ रुपये किंमतीचा रिफाइन्ड सोयाबिन तेलाचा साठा जप्त केला. १५ किलोच्या टिनाच्या डब्यात निकृष्ट प्रतीचे तेल भरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर इतवारी येथील शंकर ट्रेडींग कंपनीवर छापा टाकण्यात आला. त्यात फॉर्च्युन, किंग्ज इत्यादी कंपनीचे बनावट लेबल लावून खाद्यतेलाचे टिन सीलबंद करून त्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. शंकर दुरूगकर यांच्या मालकीचे हे दुकान आहे.
रिफाइन्ड सोयाबिन तेल (फॉर्च्युन) : १९३.४ लिटर
रिफाइन्ड सोयाबिन तेल (किंग्ज) : ११५३.४ किलो
रिफाइन्ड सोयाबिन तेल (खुले) : ३५८.४ किलो
रिफाइन्ड सोयाबिन तेल (किंग्ज) : ११५३.४ किलो
रिफाइन्ड सोयाबिन तेल (खुले) : ३५८.४ किलो
नमुने प्रयोगशाळेत
या साठ्यातून प्रत्येकी एक-एक नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रफुल्ल टोपले व विनोद धवड यांनी ही कारवाई केली.
इथे करा तक्रार
सणासुदीचे दिवस सुरू झाले असून या दिवसांत खाद्य पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढते. या भेसळीला रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी ०७१२-२५६२२०४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांनी केले आहे.
0 comments: