Tuesday, 7 July 2020

आंबेडकर : "सरकार कधी पडणार हे फडणवीसनाच माहीत,फडणवीस हे ज्योतिषी आहेत" : संजय पाटील

SHARE
prakash-ambedkar

संजय पाटील:  नागपूर प्रेस मीडिया 8 : 7: 2020 : अकोला: भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार अंतर्विरोधानेच पडणार असल्याचं विधान केलं असून त्यांच्या या विधानाची वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खिल्ली उडवली आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे ज्योतिषी आहेत. राज्यातलं सरकार कधी पडणार हे त्यांनाच माहीत. ते तारीख आणि वेळही सांगतील, असा चिमटा प्रकाश आंबेडकरांनी काढला आहे.


प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यात प्रसारमाध्यमांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यातलं आघाडी सरकार कधी पडणार हे मला माहीत नाही. मला एबीसीडीही माहीत नाही. देवेंद्र फडणवीस यांची माणसं आहेत तिथे. त्यामुळे त्यांना माहिती मिळते. फडणवीस हे महाराष्ट्राचे ज्योतिषी आहेत. त्यांना विचारा. ते तारीख, महिना, वेळ आणि वर्षही सांगतील, असा चिमटा आंबेडकरांनी काढला. पाच वर्षांपूर्वी जे आमदार आणि खासदार म्हणून निवडून आले. त्यांना पाच वर्षानंतर घरी बसावं लागेल, असं स्वप्नातही वाटलं नसेल, असं ते म्हणाले.

यावेळी काँग्रेस आणि आघाडी सरकारच्या वादावर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. आपला अपमान होतोय असं ज्या पक्षाला वाटतं त्यांनी सरकारमध्ये राह्यचं की नाही हे स्वत: ठरवायचं आहे. निर्लज्जासारखं राह्यचं असेल तर राहतील. अपमान वाटला असेल तर बाहेर पडतील. हा त्या त्या पक्षाने प्रश्न आहे. त्यांनीच त्याबाबत निर्णय घ्यावा, असा टोलाही त्यांनी काँग्रसेला लगावला.


भारत-चीन मुद्द्यावरूनही त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. चीनबरोबर एक नाटक उभं करण्यात आलं आहे. त्याची सत्यताही आता पटू लागली आहे. आता चीनचे सैनिक दोन किलोमीटर मागे गेले आहेत. पण आत किती आले होते, हे पहिल्यांदा सांगा. तेच सांगितलं जात नाही. ही शुद्ध फसवणूक आहे. देशातील जनतेची दिशाभूल केली जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी कालच प्रतिक्रिया देताना राज्यातील आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही. त्याची गरजही नाही. हे सरकार त्यांच्यातील अंतर्विरोधानेच पडेल, असा दावा केला होता. तसेच शिवसेना नेत्यांनी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची काळजी करण्यापेक्षा महाराष्ट्रातील करोना प्रादुर्भावाची आणि करोना रुग्णांची काळजी घ्यावी, असा चिमटाही काढला होता. त्यावरून आंबेडकरांनी फडणवीस यांना हा टोला लगावला आहे.
SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: