संजय पाटील द्वारा : अमरावती---महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद 'रावण' यांच्या मुंबई, पुणे, लातूर येथे सभा होणार होत्या. मात्र, परवानगी नाकारण्यात आल्याने या तिन्ही ठिकाणी सभा होऊ शकल्या नाहीत. दरम्यान, आझाद यांच्या अमरावती येथील सभेला पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर येथील सायन्स कोअर मैदानावर आज आझाद यांची महाराष्ट्रातील पहिली सभा झाली. या सभेत आझाद यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकावर कडाडून हल्ला चढविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह हिंदुत्ववादी संघटनांवर आझाद यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्रात आपणास सलग तीन दिवस नजरकैदेत ठेवण्यात आले. सभांवर बंदी घालण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काहींनी माझी सभा होवू न देण्याची विनंती केली. माझ्या सभेला परवानगी नाकारल्याने देशभरात पडसाद उमटले. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुतळे जाळण्यात आले. यामुळे घाबरलेल्या सरकारने शेवटी आपणास अमरावतीत सभा घेण्याची परवानगी दिली, असे आझाद म्हणाले.
२०१९ मध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान राहणार नाही. तुमचे व माझे अस्तित्व राहणार नाही. त्यामुळे लोकसभेची आगामी निवडणूक ही केवळ निवडणूक नसून अस्तित्वाची लढाई आहे. पूर्ण ताकदिनीशी आपल्याला या निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा आहे, असे आवाहन आझाद यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे. याच संविधानावर देश चालविला गेला पाहिजे, असेही त्यांनी निक्षून सांगितले.
अन्यायाचा प्रतिकार करा, असे संविधानात म्हटले आहे. त्यामुळे तुमच्यावर हल्ला झाल्यास तो परतवून लावा. देशात संविधानापेक्षा कोणीही मोठा होऊ शकत नाही. तसे झाल्यास त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी. प्रत्येक बहुजनाने व बाबासाहेबांच्या अनुयायांनी संविधानाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध राहीले पाहिजे. भीम आर्मीची स्थापना दलित, मुस्लिम व बहुजनांवरील अत्याचार थांबविण्यासाठी झाली आहे. संविधानाचे पालन व्हावे व प्रत्येकाला त्याचे हक्क मिळावेत, यासाठी ही संघटना कार्यरत आहे. यापुढे देशातील कोणत्याही भागात बहुजनांवर अत्याचार झाल्यास आपण चोख उत्तर देणार आहोत, असे त्यांनी ठणकावले.
प्रसारमाध्यमं, न्यायपालिका व संसदेत दलित व बहुजनांचे प्रतिनिधीत्व कमी आहे. त्यामुळे या तिन्ही क्षेत्रांना काबीज करा. २०१९ च्या निवडणुकीत आपल्या मताची किंमत ओळखा, पैशांच्या मोबदल्यात आपले अमूल्य मत विकू नका, असे आवाहन त्यांनी केले. सभेच्या व्यासपीठावर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कांबळे, सचिव मनीष साठे, शहराध्यक्ष बंटी रामटेके, जिल्हाध्यक्ष सुदाम बोरकर उपस्थित होते. सूत्रसंचालन जगदीश गोवर्धन यांनी केले.
बहुजनांना शासक बनविणार
भीम आर्मीचा उद्देश हा आपल्या लोकांना अर्थात बहुजनांना शासक बनविण्याचा आहे. शासक भीत नसतो. मुस्लिम व दलित यांना भीतीची गरज नाही. देश तुमचा असून घाबरण्याची गरज नाही. भीती दूर करण्यासाठी महापुरुषांचा इतिहास वाचा, त्यांचा संघर्ष आठवा, असे आवाहन त्यांनी केले.
दरवर्षी कोरेगाव भीमा येथे जाणार
कोरेगाव भीमा येथे मला गहिवरून आले. तेथील विजयस्तंभ वंदनीय आहे. ते एक स्फूर्तीस्थानच आहे. त्यामुळे दरवर्षी १ जानेवारीला मी कोरेगाव भीमा येथे येणार असून ज्यांना मला रोखायचे असेल त्यांनी माझी वाट अडवून दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.