![](https://www.mahanews.gov.in/FORMS/fckeditor/Election_Commission_of_India_Logo(20).png)
संजय पाटिल द्वारा
चित्रपटगृह, बल्क एस.एम.एस, केबल नेटवर्क, सोशल मीडिया, रेडियो, डीजिटल बोर्डवरील जाहिरातींचा समावेश
वर्धा : ११ एप्रिलला मतदान होणाऱ्या लोकसभा मतदारसंघासाठी आज नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. नामांकन दाखल होताच उमेदवार प्रचार सुरु करतात. उमेदवारांनी चित्रपटगृह, बल्क एस.एम.एस, केबल नेटवर्क, सोशल मीडिया, रेडियो तसेच सार्वजनिक ठिकाणी डीजिटल बोर्डवरील जाहिराती प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी विविध माध्यमांना प्रसारण करण्यापूर्वी प्रसार माध्यम सनियंत्रण समितीकडून जाहिराती प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे.
उमेदवारांनी आपल्या जाहिराती जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय भवन दुसरा माळा येथील जिल्हास्तरीय प्रसार माध्यम सनियंत्रण समितीकडे प्रमाणित करण्यासाठी द्यावयाच्या आहेत.
निवडणुकीच्या कालावधीत सर्वत्र आचारसहिंता लागू असल्यामुळे उमेदवारांनी प्रचारासाठी करावयाच्या जाहिरातीसाठी वैयक्तिक टिका-टिप्पणी, धार्मिक, जातीय भावना दुखावणारी किंवा समाजात एकमेकाबद्दल तिरस्कार, घृणा आणि तिटकारा निर्माण करणारी जाहिरात या कालावधीत प्रसारीत होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राजकिय पक्ष किंवा उमेदवाराकडून प्रसारीत करण्यात येणाऱ्या इलेक्ट्रानिक, सोशल माध्यम आणि सार्वजनिक ठिकाणी चित्रफित किंवा ध्वनीफित प्रकारातील जाहिरात मजकुराचे प्रमाणिकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. प्रमाणित न झालेल्या जाहिराती प्रकाशित झाल्यास समितीकडून संबंधित उमेदवाराला नोटीस पाठविण्यात येईल.
जाहिरातीच्या मजकूराचे प्रमाणिकरण करण्यासाठी राष्ट्रीयकृत पक्षाच्या उमेदवारासाठी जाहिरात प्रसारीत करण्याच्या तीन दिवस पूर्वी सदर जाहिरातीची सी. डी. आणि संहिता (स्क्रिप्ट) दोन प्रतीत विहित नमुन्यात सदर समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत नसलेल्या पक्षांच्या उमेदवारांनी जाहिराती प्रमाणित करण्यासाठी द्यावयाचा अर्ज प्रसारणारपूर्वी सात दिवस आधी द्यावा. अर्जासोबत जाहिरात तयार करण्यासाठी केलेला खर्च आणि जाहिराती प्रसारणासाठी येणाऱ्या खर्चाचा तपशिल विहित अर्जात देणे बंधनकारक आहे.
मुद्रित माध्यमासाठी शेवटच्या ४८ तासात देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करुन घेणे आवश्यक आहे.
0 comments: