संजय पाटील द्वारा नागपूर----वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे सर्वेसर्वा व खासदार असदुद्दीन ओवेसी यांची १ एप्रिलला नागपुरात जाहीर सभा होत आहे. हे दोन्ही नेते याच दिवशी चंद्रपूर व अमरावती येथेही प्रचारसभेला संबोधित करतील.
सकाळी ११ वाजता हेलिकॉफ्टरने सर्वप्रथम चंद्रपूर येथील सभेला अॅड. आंबेडकर व खासदार ओवेसी संबोधित करतील. या मतदारसंघात वंचित आघाडीतर्फे डॉ. राजेंद्र महाडोले हे उमेदवार आहेत. दुपारी २ वाजता अमरावती येथे आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्यासाठी हे दोन्ही नेते जाहीर सभा घेतील. त्यानंतर हेलिकॉप्टरनेच नागपुरात येऊन नागपूरचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सागर डबरासे, रामटेकच्या उमेदवार किरण पाटणकर-रोडगे यांच्या विजयासाठी जाहीर सभेला संबोधित करतील. बहुधा उत्तर नागपुरातील इंदोरा मैदान येथे सायंकाळी या जाहीर सभा होतील. तशी परवानगी मागण्यात आली आहे. या जाहीर सभेवेळी वंचित बहुजन आघाडीचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धनराज वंजारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांची जाहीर सभेच्या यशस्वीतेसाठी बैठक झाली. यात वंचित आघाडीसोबत समन्वय साधून सभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती आहे. माहितीनुसार, एमआयएमला नागपुरात उमेदवारी हवी होती. मात्र,उमेदवारी देण्यात आली नसल्याने एमआयएमच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर नाराजीही व्यक्त केली. तरीही, राज्यात वंचित बहुजन आघाडीचे ज्या पद्धतीने यापूर्वी सभा यशस्वी झाल्या त्यापद्धतीनेच या सभाही होतील, असा दावा करण्यात आला.
0 comments: