Saturday, 8 February 2020

"धमक्यांना न घाबरता लिखाण करा"-साहित्यिक अरुणा सबाने - संजय पाटील

SHARE
Image result for aruna sabane

संजय पाटील:नागपूर 'लिखाणाच्या प्रांतात वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. भिन्नभिन्न विषय आणि साहित्य प्रकार हाताळल्याने लिखाण समृद्ध होत असते. पण, हल्ली धडाडीच्या आणि वास्तववादी लिखाणावरून धमक्या येण्यास सुरुवात झाली आहे. या धमक्यांना न घाबरता लिखाण करायला हवे. कितीही धमक्या आल्या, तरी लिखाणावरील निष्ठा कायम असायला हवी,' असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक व साहित्यिक अरुणा सबाने यांनी शनिवारी केले.
पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात दोनदिवसीय वार्षिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, संस्थेच्या अध्यक्ष शुभांगी भडभडे, विजया ब्राम्हणकर उपस्थित होत्या. सबाने म्हणाल्या, 'प्रत्येकाच्या लिखाणाची शैली, धाटणी व पोत वेगळा असल्यामुळे अनेकदा त्यावरील टीका सहन होत नाही. मात्र, आपण काय लिहितो आणि कशासाठी लिहितो, याचे आत्मपरीक्षण करायले हवे. आत्मपरिक्षणातून दर्जेदार निर्मिती होत असते. मुळात लिखाण इतके सोपे नाही. जे आपण लिहितो त्यावर टीका झाली तर आपण ती सहन करत नाही. जेवढे लिहाल तेवढी आपली लेखणी आणि भाषा समृद्ध होईल, याची सदैव जाणीव ठेवायला हवी.' शैलेश पांडे म्हणाले, 'गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या विषयावर लिहिणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली आहे. स्त्रियांनी लिखाणामध्ये नवनवे प्रयोग करायला हवेत.
कार्यक्रमात बळवंत भोयर व विजया मारोतकर यांना 'मालिनी राजाभाऊ बोबडे सामाजिक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. सतीशकुमार पाटील (कोल्हापूर), निर्मलकुमार सूर्यवंशी (नांदेड), अरुण नाईक (गोवा), जयश्री उपाध्ये (नागपूर), परिणिता कवठेकर, आ. य. पवार (जामखेड), ज्योत्स्ना चांदगुडे (पुणे), श्रृती वडगबाळकर (कोल्हापूर), डॉ. संभाजी पाटील (लातूर), संगिता अरबुने (वसई), डॉ. गणेश चव्हाण (नागपूर), गणेश भाकरे (सावनेर) डॉ. वर्षा सगदेव (नागपूर), शामल कामत (मुंबई) यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता वाईकर यांनी केले.

SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: