स्व.मनोहरभाई पटेल जयंतीनिमीत्त सुवर्ण पदक वितरण समारंभसंजय पाटील : गोंदिया : जिल्ह्याच्या विकासासाठी एका विशिष्ट दृष्टीकोनातून इथल्या विमानतळाचा विकास, वैमानिक प्रशिक्षण संस्था आणि वेगवेगळ्या शिक्षणाच्या सुविधेसाठी संस्थांची निर्मिती मनोहरभाई पटेल आणि प्रफुल पटेल यांनी केली आहे. गोंदिया शिक्षण संस्था ही गुणवत्तेला महत्त्व देऊन दोन्ही जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे. शिक्षणातूनच प्रगतीचा मार्ग प्रशस्त होतो. असे प्रतिपादन राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केले.गोंदिया येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११४ व्या जयंती निमित्ताने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सुवर्ण पदक वितरण समारंभाचे उद्घाटक म्हणून श्री. पायलट बोलत होते. अध्यक्षस्थानी खा.प्रफुल पटेल हे होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री तथा पालकमंत्री अनिल देशमुख, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, चित्रपट अभिनेता सुनील शेट्टी यांची उपस्थिती होती.श्री. पायलट म्हणाले, शिक्षणासाठी जो राज्याचा पैसा खर्च होतो तो खर्च नसून गुंतवणूक आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात जे शिक्षण देण्यात येते, त्या शिक्षणातून विविध क्षेत्राच्या विकासाला गती मिळते. गुणवंत विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने परिश्रम, जिद्दीने यश संपादन केले आहे त्यांची प्रेरणा इतर विद्यार्थ्यांनी घेऊन शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वंचित, शोषित, शेतकरी व शेतमजूरांच्या मुलांनी जिद्दीने शिक्षण घेवून आयएएस, आयपीएस सारखी मोठी पदे भूषवावीत. त्यामुळे आपण ज्या समाजातून आलेलो आहोत याची जाणीव ठेऊन त्या समाजाच्या विकासाला गती मिळण्यास याचा हातभार लागेल असे त्यांनी सांगितले. श्री. पटेल म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी करण्यात येतो. या विद्यार्थ्यांची प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपला नावलौकिक करावा हा उद्देश आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १९५६ मध्ये कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधा नसताना मनोहरभाई पटेलांनी गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना करुन शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली. सर्वप्रथम त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिले. त्यांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात या शिक्षण संस्थेत जवळपास १ लाख २५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी विविध शाखेत शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणासोबतच मनोहरभाईंनी सिंचनाकडेही लक्ष दिल्याचे सांगून खा.पटेल म्हणाले, अनेक सिंचन प्रकल्पाची सुरुवात त्यांच्या काळात झाली. दोन्ही जिल्ह्यात अनेक विकास कामे झाली. केवळ एवढ्याच विकासावर न थांबता आणखी विकास करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींवर विकासाची जबाबदारी आहे. ४७० कोटी रुपये निधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी मंजूर असून नियोजित जागेवर येत्या दोन वर्षात ही इमारत पुर्ण होईल असा विश्वास व्यक्त करुन श्री. पटेल यांनी धापेवाडा टप्पा-२ आणि टप्पा-३ चे काम देखील दोन वर्षात पूर्ण करावयाचे असून गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री. पटोले म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्याचे काम मनोहरभाई पटेलांनी केले. प्रफुल पटेल यांच्या पुढाकारातून दोन्ही जिल्ह्यात वन कायद्यात अडकलेले अनेक सिंचन प्रकल्प सोडविण्यात आले आहे. त्यामुळे हे सिंचन प्रकल्प पुर्ण होण्यास मदत होणार आहे. धापेवाडा टप्पा-२ आणि धापेवाडा टप्पा-३ पुर्ण होताच दोन्ही जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात समृद्धीचा मार्ग प्रशस्त होण्यास मदत होणार आहे. मार्चअखेर गोंदिया-जबलपूर रेल्वे लाईनचे काम पुर्ण होणार असल्यामुळे दक्षिण ते उत्तर रेल्वे लाईनचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापाराला चालना मिळण्यास मदत होणार आहे. शिक्षण क्षेत्रात आणखी काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून श्री. पटोले म्हणाले, आज बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. बेरोजगारांना तांत्रिक आणि कौशल्याचे शिक्षण दिले तर त्यांना स्वावलंबनास मदत होणार आहे. विधानसभा अध्यक्ष या नात्याने राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम करण्यात येईल असे सांगितले. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पोलिसांच्या विविध ठिकाणी असलेल्या शासकीय निवासस्थानांची दुरावस्था झाली आहे. यासाठी गृह विभागाने चांगले क्वार्टर्स बांधण्याचे काम हाती घ्यावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली. श्री. देशमुख म्हणाले, मनोहरभाई पटेलांनी त्या काळात दोन्ही जिल्ह्यात शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली. शेतकऱ्यांसाठी सिंचन प्रकल्पाची सुरुवात केली. दोन्ही जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे यादृष्टीने काम केले. राज्यात ८ हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसह धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे काम येत्या दोन ते तीन वर्षात पुर्ण करण्यात येईल. अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील. शासनाने २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले असून लवकरच २ लाख रुपयांवरील कर्ज माफ करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले. श्री. ठाकरे म्हणाले, गोंदिया शिक्षण संस्थेचा परिसर बघून असे वाटत आहे की, आपण एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कॉलेजच्या परिसरात आलो आहे. विद्यार्थ्यांनी आणि संस्थेनी चांगली जपवणूक केली आहे. इथे शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. चांगली मेहनत व परिश्रमातून विद्यार्थ्यांनी हे यश गाठले आहे. मनोहरभाई पटेल यांचा वारसा प्रफुल पटेलांनी यशस्वीपणे पुढे चालविला आहे. दोन्ही जिल्ह्यात शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण गावागावापर्यंत घेऊन जाण्याचे काम त्यांनी केले. शिक्षण हे महाराष्ट्रासाठी गरुड झेप आहे. देशाला सुपरपॉवर बनवायचे असेल तर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनेता सुनिल शेट्टी यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केल्याने उपस्थित युवावर्गाने टाळ्यांचा कडकडाट करुन प्रतिसाद दिला. चांगल्या समारंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभल्याचे सांगून श्री. शेट्टी म्हणाले, गोंदिया शिक्षण संस्था उत्तम प्रकारे काम करत आहे. शिक्षण हे जीवन आहे. तुमच्याकडे असलेली बुद्धी कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मी अभिनेता आहे नेता नाही त्यामुळे मला भाषण देता येत नाही असे सांगितले. चित्रपटातील ‘मै तुम्हे भूल जाऊ यह हो नही सकता और तुम मुझे भूल जाओ ये मै होने नही दुंगा’ हा संवाद ऐकवून उपस्थितांच्या प्रचंड टाळ्या घेतल्या. भविष्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाला नक्कीच येईल असे ते म्हणाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील आदित्य राहुलकर, कल्याणी सोनवाणे, सिया ठाकुर, अर्चना राऊत, अक्षय शिवणकर, मेघा अग्रवाल, सोनिया नंदेश्वर, प्रतिक्षा वेदपुरीया, खुशी गंगवाणी, सुषुप्ती काळबांडे, पायल चोपडे, समिक्षा बोरघरे व मनिषा भदाडे यांचा सुवर्ण पदक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वागतगीत मनोहरभाई पटेल सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय परिसरात असलेल्या गोंदिया शिक्षण संस्थेत मान्यवरांचे आगमन होताच राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी कृषी प्रदर्शनाचे उदघाटन केले. बिरसी विमानतळ येथून पाहुण्यांचे सर्वप्रथम मनोहरभाई पटेल इंजिनियरींग महाविद्यालयाच्या परिसरात आगमन झाले. यावेळी पाहुण्यांनी मनोहरभाई पटेल यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण केले. बिरसी विमानतळ येथे मान्यवरांचे आगमन होताच त्यांनी बिरसी विमानतळ येथे असलेल्या वैमानिक प्रशिक्षण संस्थेला भेट दिली. कार्यक्रमाला मंचावर गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल, भंडारा जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, युवक-युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन माजी आ.राजेंद्र जैन आणि जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार माजी आ.राजेंद्र जैन यांनी मानले. |
Tuesday 18 February 2020
SHARE
Author: Journalist Sanjay Patil verified_user
I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM
0 comments: