संजय पाटील: नागपूर : एकट्या नागपूरपुरता विचार केला तर जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाखांच्या वर आहे. सरासरी लोकसंख्येच्या किमान दहा टक्के खाटा या व्हेंटिलेटर्सच्या असाव्यात, असे वैद्यकीय निकष म्हणते. त्यात करोनासारख्या विषाणूचा थेट परिणाम फुप्फुसांवर होतो. त्यामुळे हा आजार उंबरठ्यावर असताना साहजिकच व्हेंटिलेटर्स अर्थात कृत्रिम श्वासोच्छ्वास प्रणालीची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे.
वास्तवात, एकट्या मेडिकलकडे सध्या जेमतेम ८६ व्हेंटिलेटर्स आहेत. तर मेयोत जेमतेम २६ आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर खासगीची मदत घेतली जाईल, असे सरकारी यंत्रणा दाव्यानुसार सांगत आहे. त्याचीही गोळाबेरीज केली तर एकट्या नागपूर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये मिळून १२०० व्हेंटिलेटर्स उपलब्ध होऊ शकतात. मात्र, करोनाचा वाढता पसारा लक्षात घेता ही यंत्रणाही अपुरी पडणार आहे. त्यामुळे एकट्या मेडिकलने युद्धपातळीवर १५० व्हेंटिलेटर्स खरेदीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला सादर केला आहे. मेयोने देखील १८ व्हेंटिलेटर्स खरेदीचा प्रस्ताव पाठविला आहे. सध्याची करोनाची स्थिती पाहता, व्हेंटिलेटर्स खरेदीसंदर्भात युद्धपातळीवर निविदा काढून खरेदी प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, ही उपकरणे बनविणाऱ्या कंपन्यांनी तूर्तास लॉकडाऊन असल्याने उत्पादन बंद असल्याचे कळविले. त्यामुळे खरेदी प्रक्रियादेखील लॉकडाऊन झाली आहे. तब्बल १५० व्हेंटिलेटर्स खरेदीचा प्रस्ताव सादर झाल्याच्या वृत्ताला मेडिकलमधील वैद्यकीय सूत्रांनीदेखील नाव न छापण्याच्या अटीवर दुजोरा दिला.
करोनाचा विषाणू सध्या गुणाकार पद्धतीने समुदाय प्रादुर्भावाच्या माध्यमातून दिवसागणिक वाढत आहे. व्हेंटिलेटर्स खरेदीचे हजारो प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे राज्यभरातून सादर झाले आहेत. दुसरीकडे, साखळी खासगी रुग्णालयांनीदेखील उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्स खरेदीची डिमांड भरली आहे. परिणामी, व्हेंटिलेटर्सचा कमालीचा तुटवडा निर्माण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
0 comments: