पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन गडकरी यांची नागपूर प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे
संजय पाटील : नागपूर : करोनाचा संसर्ग नागपुरात सध्या नियंत्रणात आहे. पुढील आठ दिवस महत्त्वाचे आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करा, अन्यथा टाळेबंदी वाढवावी लागेल, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना दिला.
करोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी केंद्राने केलेल्या उपाययोजनांचा आढावा मंगळवारी गडकरी यांनी महालातील टाऊन हॉल येथे घेतला. त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे. या बैठकीला महापौर संदीप जोशी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
नागपुरात सुदैवाने परिस्थिती सध्यातरी आटोक्यात आहे. परंतु भविष्यात जर अधिक रुग्ण आढळले तर त्या परिस्थितीशी लढण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची गरज आहे. मेयो, मेडिकल आणि एम्स यांनी समन्वय ठेवून पुढील एक महिन्यासाठी संच, औषध, मास्क आदींचा साठा करून ठेवावा. मेयो, एम्समध्ये चाचण्या केल्या जात आहेत. मेडिकलमधील प्रयोगशाळा एक-दोन दिवसात सुरू होईल. त्यामुळे नमुन्यांची तातडीने चाचणी करा.
मरकजहून परतलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुप्तचर विभागाची मदत घ्यावी व त्यांना विलगीकरणात ठेवावे, असे निर्देशही त्यांनी दिले. स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींकडे आमदारांनी गडकरींचे लक्ष वेधले. कॉटन मार्केट सुरू करण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. पण मुंढे यांनी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितल्यावर पुढे या विषयावर चर्चा झाली नाही.
रुग्णवाहिका सज्ज ठेवा!
टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका सेवा कोलमडली असल्याची तक्रार यावेळी आमदारांनी केली. खासदार निधीतून महापालिकेला दिलेल्या सहा रुग्णवाहिकांपैकी तीन मेडिकल आणि तीन मेयोकडे सोपवा, असे निर्देशही गडकरी यांनी दिले. सुपर स्पेशालिटीमधील अव्यवस्थेवर नाराजी व्यक्त करीत शस्त्रक्रियेची प्रतीक्षा यादी संपवा, असे निर्देशही मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुजल मित्रा यांना दिले.
काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा
टाळेबंदीचा फायदा घेत व्यापारी जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करीत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे निर्देश गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
गडकरींच्या बैठकीकडे महाआघाडीची पाठ
करोनाच्या विरोधात सर्वांनी एकजुटीने लढा उभारल्यानंतरही या संकटसमयी उपराजधानीत मंगळवारी राजकारण तापले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बोलावण्यात आलेल्या बैठकीस राज्यातील सत्तारुढ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या एकजात सर्व नेत्यांनी बहिष्कार टाकला. राज्यातील सत्तारुढ नेत्यांनी पाठ फिरवल्याने कुणाचे ऐकावे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नितीन गडकरी यांची नियुक्ती केली आहे. गडकरी यांनी फोनवरून राज्यातील स्थिती जाणून घेतल्यावर केंद्राकडे अहवाल पाठवला. मंगळवारी बैठक घेत शहर व ग्रामीण भागातील उपाययोजनांची माहिती घेतली. आवश्यक सूचना केल्या. महालातील नगरभवनात ही बैठक झाली. यास पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार आणि पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, विधान परिषद सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये हे सर्वच्या सर्व नेते अनुपस्थित होते. महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे हेच तेवढे उपस्थित होते.
पालकमंत्री नितीन राऊत यांनी शहर व ग्रामीण भागातील स्थितीवर बारीक लक्ष ठेवले आहे. सर्व संबंधित विभागाच्या त्यांनी वारंवार बैठका घेतल्या आहेत. शहराच्या विविध भागांचा दौरा केला आहे. सुनील केदार यांनी अलीकडेच मदत कार्य व दुध उत्पादनाची स्थिती जाणून घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख लॉकडाउनपूर्वीच मुंबईला गेले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि बंदोबस्ताची सूत्रे राजधानीतून सांभाळत आहेत. बाकी नेते का अनुपस्थित होते, हा प्रश्न आहे. केंद्र आणि राज्याने या संकटाचा हातात हात घालून सामना करावा या उद्देशालाच या गैरहजेरीने हरताळ फासला गेल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी सोमवारी चर्चा केली. गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधानांना पत्र लिहून खासदारांच्या वेतनातील कपातीचे स्वागत केले व निधीबाबत सूचना केल्या. असाच समन्वय नागपुरात दाखवता आला असता, अशीही चर्चा आहे. महाराष्ट्रावरील संकट अधिक गडद होत असताना आणि नागपुरातील रुग्णसंख्या वाढत असतानाच केंद्राकडून काय अपेक्षा आहेत, हे या बैठकीत राज्यातील मंत्र्यांना, सत्तापक्षातील आमदारांना मांडता आले असते, अशी भावना अन्य नेत्यांनी व्यक्त केली.
महापालिका आयुक्तपदाची तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून भाजपचा प्रभाव अचानक कमी झाला. महापौर संदीप जोशी यांच्यासह बहुतांश नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. सत्तारुढ भाजप व आयुक्तांमध्ये कुरघोडी सुरू असल्याची चर्चा आहे. सनदी अधिकाऱ्यांमध्येही समन्वयाच्या अभावाची दबक्या आवाजात चर्चा आहे. अशा परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. केंद्रात तसेच उपराजधानी नागपुरात भाजप तर, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. राष्ट्रीय संकटाशी लढताना सत्तेच्या या त्रिकोणाचा फटका नागपूकरांना बसू नये, यासाठी सर्व नेत्यांना परिपक्वता दाखविता येऊ नये हे समस्त नागपूरकरांचेच दुर्दैव असल्याची खंत नागरिकांनी, उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
|
Tuesday, 7 April 2020
SHARE
Author: Journalist Sanjay Patil verified_user
I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM
0 comments: