संजय पाटील : नागपूर : लॉकडाउनच्या काळात कुणावरही उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी शासनाकडून रेशन धान्य दुकानातून धान्य वाटप करण्यात येत आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या मोफत किटही देण्यात येत आहे. मात्र, धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत असून, प्रशासनाने २२ रेशन धान्य दुकानदारांवर कारवाई केली. १४ जणांची अनामत रक्कमही जप्त करण्यात आली असल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून सांगण्यात आले.
करोनाच्या संकटात सापडलेल्या कष्टकऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाकडून त्यांना मोफत धान्य देण्यात येत आहे. एकीकडे आपल्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी गरिबांची धावपळ सुरू असताना गरिबांचे धान्य हिरावून घेण्याच्या घटनाही पुढे येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील २२ रेशन धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील दोन दुकानदारांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. दोघांचे परवाने पुढील चौकशीपर्यंत निलंबित करण्यात आले. १४ जणांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली असून ९ जणांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली असल्याचे पुरवठा कार्यालयाकडून सांगण्यात आले. जयताळा, सदर झोन, इतवारी झोन येथील दुकानांचा यात समावेश आहे.
गरिबांचा घास हिरावला
शासनाकडून गरिबांना देण्यासाठी रेशन धान्य दुकानात पाठविण्यात आलेला माल लपवून ठेवण्यात आल्याच्या घटनाही पुढे आल्या आहेत. सावनेर येथील भिलवाडा, गडेगाव येथील दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यांचे परवाने इतर दुकानांशी जोडण्यात आले आहेत. नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पुरवठा कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली. साठवून ठेवलेला माल जप्त करण्यात आला असून सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत तो पोहोचविला जाईल. कामठीतील येरखेडा येथे अधिक पैसे घेतले जात असल्याची तक्रार होती. कळमेश्वर येथील चिचभवन येथेही कमी माल देत असल्याची तक्रार होती.
हक्काचे धान्य घ्या
रेशन धान्य दुकानातून प्राप्त होणाऱ्या धान्यावर पात्र लाभार्थ्यांचा अधिकार आहे. हे धान्य कुणी लाटण्याचे प्रयत्न करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शहरात १५ लाख ४५ हजार १३१ आणि ग्रामीणमध्ये १६ लाख ६७ हजार ५८४ लाभार्थी आहेत. आपले हक्काचे धान्य रेशन दुकानातून मिळवा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अंत्योदय शिधापत्रिकाधारक वाटपाचे परिणाम : दर
१५ किलो गहू : २ रुपये २० किलो तांदूळ : ३ रुपये १ किलो साखर : २० रुपये
१ किलो तूरडाळ : ५५ रुपये १ किलो चनाडाळ : ४५ रुपये १ किलो साखर : २० रुपये
प्राधान्य कुटुंब लाभार्थी वाटपाचे परिणाम : दर
३ किलो गहू : २ रुपये २ किलो तांदूळ : ३ रुपये १ किलो तूरडाळ : ५५ रुपये
१ किलो चनाडाळ : ४५ रुपये
0 comments: