संजय पाटील : करोनामुळे देश लॉकडाउनमध्ये ढकलला गेला. तर लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेलाच खिळ बसली. या दोन्ही संकटांचा मुकाबल करत अर्थचक्राला गती देण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. केंद्राच्या पॅकेजवर शिवसेनेनंही आपली भूमिका मांडली आहे. “२० लाख कोटी रुपये सरकार आणणार कोठून?, पंतप्रधानांनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर करूनही शेअर बाजाराच्या बैलानं साधं शेपूटही का हलवले नाही?,” असा सवाल करत शिवसेनेनं केंद्राला सल्लाही दिला आहे.
केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजवर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत. शिवसेनेनंही ‘सामना’च्या अग्रलेखातून २० लाख कोटींचं पॅकेज आणि आत्मनिर्भर भारत अभियान यावर भाष्य केलं आहे. मोदी सरकारला प्रश्न विचारत शिवसेनेनं काही सल्लेही दिले आहेत. ” पंतप्रधानांनी ‘लॉक डाऊन-४ नव्या स्वरुपात पेश करण्याबाबत घोषणा केली. त्याचबरोबर कोसळलेली अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. हे पॅकेज हिंदुस्थान स्वावलंबी, आत्मनिर्भर बनविण्यासाठी आहे असे पंतप्रधान सांगत आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेवर पंतप्रधानांनी भर दिला आहे. त्याबाबत ते टप्प्याटप्प्याने घोषणा करतील. सध्या उद्योग, व्यवसाय, व्यापार ठप्प आहे. बड्या भांडवलदारांनाही घाम फुटला आहे. छोटे, मध्यम आकाराचे उद्योग तर मरून पडले आहेत. पंतप्रधानांचे २० लाख ‘कोटीं’चे पॅकेज याच लघू, मध्यम आणि छोटे उद्योजक तसेच व्यावसायिकांना आधार देण्यासाठी आहे. गरीब, मजूर, शेतकरी, नियमित कर देणार्या मध्यमवर्गीयांनाही या पॅकेजचा लाभ मिळेल, असे भासवण्यात आले आहे. एकंदरीत २० लाख कोटी हे देशातील १३० कोटी लोकसंख्येत वाटले जातील व त्यातील गरीब, मध्यमवर्गीयांना या पॅकेजचा लाभ मिळेल, असे पसरवले गेले आहे. या २० लाख कोटीतून हिंदुस्थान स्वावलंबी बनेल. म्हणजे तो आता स्वावलंबी नाही काय?,” असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी विश्वास द्यायला हवा
“उद्योगपती, व्यावसायिक, व्यापारी यांनी गुंतवणूक करावी, असा माहोल आता निर्माण व्हायला हवा. उद्योगपती पळून जाणे हे आता नव्या आत्मनिर्भरतेकडे जाणार्या हिंदुस्थानला परवडणारे नाही. उद्योजक, व्यापारी यांना टिकवून ठेवावे लागेल. त्यासाठी दहशत निर्माण करणार्या ईडी, सीबीआयसारख्या ‘राजकीय’ संस्थांचे काही काळ ‘लॉक डाऊन’ करावे लागेल. लॉक डाऊन – ४ चे सुतोवाच करताना पंतप्रधानांनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर करूनही शेअर बाजाराच्या बैलाने साधे शेपूटही का हलवले नाही? याचा विचार केला तर एकच कारण दिसते ते म्हणजे भांडवलदार, गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहेत. त्यांना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी विश्वास आणि अभय दिलेच पाहिजे!,” असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.
0 comments: