Wednesday 13 May 2020

वंचित लाभार्थ्यांनी फेकले रेशनकार्ड : संजय पाटील नागपूर

SHARE
वंचित लाभार्थ्यांनी फेकले रेशनकार्ड
फ़ेकू नका आपले राशन कार्ड त्याना फ़ेका ज्याना तुमची कालजी नाही

संजय पाटील : नागपूर:   लॉकडाउन काळात कुठलाही रेशनाकार्डधारक धान्यापासून वंचित राहणार नाही, असे जिल्हा प्रशासनाचे स्पष्ट आदेश असताना शहरात अनेक ठिकाणी रेशनकार्डधारक धान्यासाठी भटकत आहेत. काही ठिकाणी रांगेत लागूनही धान्य मिळत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी रेशनकार्ड फेकले. कंटेनमेन्ट झोन असलेल्या पार्वतीनगर आणि आसपासचे अनेक लाभार्थी मे महिन्याच्या धान्यासाठी प्रतीक्षेत आहेत.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी तांदूळ मोफत देण्यात येत आहे. प्रतिव्यक्ती पाच किलोप्रमाणे तांदूळ देण्यात येत आहे. एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने धान्य मोफत देण्यात येत आहे. आता शासनाने स्वस्त धान्य दुकानात तुरडाळ आणि चनाडाळ उपलब्ध करून दिली आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्य शिधापत्रिका धारकांनाही दोन रुपये किलो दरात गहू आणि तीन रुपये किलो दरात तांदूळ देण्यात येत आहे. मात्र हे धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत असल्याने रोष वाढत आहे.

अनेकांना शिविगाळ

उदयनगर येथील रेशन धान्य दुकानदाराने लाभार्थ्यांचे कार्ड गोळा केले. लाभार्थ्यांना ताटकळत ठेवले. मात्र प्रत्यक्ष धान्य दिलेच नाही. नागरिकांनी धान्य मागताच दुकानदाराने अनेकांचे कार्ड खाली फेकून दिले. एनसीसीचे विद्यार्थी होते तोपर्यंत धान्य मिळत होते. आता दुकानदारांची मुजोरी चालत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. दुकानदाराकडून शिविगाळही करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.
पार्वतीनगरात अनेकांना त्रास
पार्वतीनगर कंटेनमेन्ट झोन आहे. त्यामुळे हा परिसर सील आहे. परिसरात एकूण चार रेशन दुकाने आहेत. त्यापैकी दोन रेशन दुकानात हजारो कार्डधारक आहेत. या दुकानांतून पार्वतीनगरसह रामेश्वरी, जोगीनगर, भीमनगर, धारीवाल ले-आऊट, ८५ प्लॉट, रहाटेनगर टोळी, शताब्दीनगर, रेणुका विहार कॉलनी भागातील कार्डधारकांना धान्य दिले जाते. मार्च, एप्रिल महिन्याचे रेशन मिळाले. मात्र मे महिन्याचे रेशन मिळाले नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. रेशन दुकानात जात असताना पोलिस जाऊ देत नाहीत. पोलिस नगरसेवकांना संपर्क करण्यास सांगतात. परंतु येथील नगरसेवक अंबाझरी भागात राहतात. त्यामुळे नागरिकांची अडचण असल्याचे येथील कार्यकर्ते खुशाल डाक यांनी सांगितले. जिल्हा पुरवठा अधिकारी कंटेनमेन्ट झोनमधील रेशन दुकानातील कार्डधारकांना दुसऱ्या कोणत्या भागातून धान्य मिळेल याची कुठलीही नोटीस न लावल्याने रोज मोठ्या संख्येत नागरिक निराश परत जात आहेत. ऑटो रिक्षाचालक, पेंटर, मजूर आदी नागरिक येथे रेशनधारक आहेत. पैसे नसल्याने ते दुकानांतून धान्य खरेदी करू शकत नाहीत. त्यामळे त्यांच्या अडचणी वाढत आहेत.

डाळ संपली कशी ?

४०१ मेट्रीक टन तूरडाळ आणि ४५१ मेट्रिक टन चनाडाळ जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे. एप्रिल, मे महिन्याची डाळ एकत्र देण्यात येत आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील १२ लाख ९४ हजार ६८४ केशरी कार्डधारकांना लाभ मिळणार आहे. १ मे पासून केशरी कार्डधारकांना धान्याचे वितरण सुरू झाले. मे आणि जून महिन्यासाठी धान्य देण्यात येत आहे. शासनाकडून डाळ उपलब्ध करून दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र डाळ संपली असे उत्तर रेशन धान्य दुकानदारांकडून दिले जात आहे.

SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: