संजय पाटील : नागपूर :नागपूर प्रेस मीडिया : 17 मे 2020: राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं होतं.
लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करत असताना सरकारने इतर गोष्टींची सविस्तर माहिती दिलेली नाही. पण याआधी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत. पण करोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “केंद्राच्या नियमावलीची आपण वाट पाहत असून त्यानंतर आपली नियमावली जाहीर करणार आहोत. यावेळी दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने आपली परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा देण्याचा विचार आहे. प्रत्येकाला काळजी घेणं आवश्यक राहणार आहे. सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावं अशी अपेक्षा असणार आहे”.
करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसून देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन वाढवलं जाणार असल्याची घोषणा केली असून ते कधीपर्यंत वाढवलं जाणार आहे याबद्दल माहिती दिलेली नाही. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीदेखील बैठकीला हजर होते.
0 comments: