संजय पाटील : राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने राज्यातील सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
मुंबई महापालिकेने बुधवारी पत्रक काढून सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात थेट अटकेची कारवाई होऊ शकते, याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. आता गृहमंत्र्यांनीही नागरिकांना याची जाणीव करून दिली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसह राज्यातील ज्या शहरांमध्ये व भागांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे तेथे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करून स्वतःचे व इतरांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
मंत्र्यांना नियम नसतात का ?
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना 'मास्क वापरा', असे कळकळीचे आवाहन केल्यानंतरही राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार गुरुवारी मास्क न लावताच शहरभर फिरले. प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये मास्क लावणे सर्वांना अनिवार्य केले असताना ते नियम मंत्र्यांना लागू नाहीत काय? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
दिवसेंदिवस करोना पॉझिटिव्ह आणि संशयितांची संख्या वाढत आहे. विलगीकरण करण्यात येत असलेल्या लोकांमध्येही वाढ झाली आहे. करोना तिसऱ्या टप्प्याकडे वाटचाल करीत असताना, कठोर पावले उचलण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. प्रशासनाच्या आदेशावरून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली आहे. अशावेळी राज्याचे मंत्री सुनील केदार गुरुवारी सकाळी कळमना मार्केट परिसरात भेट देण्यासाठी गेले. त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी मास्क लावला. केदार यांनी तसे करणे टाळले.
केदार हे बेधडक मंत्री आहेत. सावनेर परिसरातील लोकप्रिय नेते अशी त्यांची ओळख आहे. भंडारा जिल्ह्यातील दूधभुकटी प्रकल्प लॉकडाउन काळात सुरू करण्याचा शब्द पाळल्याबद्दल अलीकडेच त्यांचे कौतुकही झाले होते. एकीकडे 'गर्दीत जाणे टाळा', अशा सूचना सरकारने मंत्र्यांना विशेषत्वाने दिल्या आहेत. गरीब, श्रीमंत, मंत्री अथवा सामान्य असा भेदभाव बघून रोगाची लागण होत नाही. सगळ्यांनाच या आजाराने कवेत घेतले आहे. जनतेची कामे करताना केदारांनी मास्क लावूनच फिरावे, असा आग्रह त्यांच्या निकटच्या मित्रमंडळींनी त्यांना केला आहे. काळजीतून केलेल्या अशा सूचनांकडे दुर्लक्ष करू नये, अशी गळही त्यांना अनेकांनी घातली. दरम्यान, मंत्रीच असे वागले तर सामान्य जनतेकडून काय अपेक्षा करायच्या? असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
0 comments: