संजय पाटील : भंडारा : लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील असंख्य नागरिकांना रोजगारापासून वंचित रहावे लागले असून त्यांच्याकडे सध्या उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. भरीस भर म्हणून यावर्षी अवकाळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची हातातली पीक सुद्धा गेली आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कुठल्याही नागरिकांची उपासमार होऊ नये, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.
अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून विविध उपाययोजना केलेल्या आहेत. तांदुळ व गहूचा साठा मुबलक ठेवा, वितरण करतांना काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्या, योग्य वितरण करा, जनतेस त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असेही ते म्हणाले.
कोविड-१९ च्या उपाययोजनेंतर्गत शासकीय अन्नधान्य वितरण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, पणन अधिकारी श्री. खाडे यावेळी उपस्थित होते.
नोवल कोरोना व्हायरस प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्याोरतील अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून विविध उपाययोजना केलेल्या आहेत. नागरिकांना रेशनचा धान्य पुरवठा करण्यात येत असून रेशन कार्ड धारक व्यक्तींना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शिवभोजन च्या माध्यमातून कामगार, विस्थापित व भिकारी यांच्या भोजनाची सोय करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. शिवभोजन थाळीची व्याप्ती वाढविण्याच्या सूचना पटोले यांनी यावेळी यंत्रणेला दिल्या.
विधानसभा अध्यक्षांनी जिल्ह्यातील लॉकडाऊन परिस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी यांचेकडून घेतला. १४ एप्रिल नंतर जिल्ह्यात विविध कामासाठी होणारी नागरिकांची गर्दी तसेच वाहतूक याबाबत माहिती त्यांनी जाणून घेतली. वेळ पडल्यास मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे नियोजन करण्यात यावे. कोरोना उपाय योजनेसाठी जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन सहाय्यता निधीत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोना लॉकडाऊनने आपणास संस्कार व शिस्तचे पालन करण्यास शिकविले आहे. जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून विविध उपाययोजना केलेल्या आहेत, असे विधानसभा अध्यक्ष पटोले म्हणाले. जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.
नोवल कोरोना व्हायरस प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यात पोर्टेबिलीटी असल्याने राज्यातील कुठल्याही जिल्ह्यातील व्यक्ती रेशन घेण्यास पात्र असून त्यास रेशन देण्यात येत आहे. जिल्ह्यात नवीन दरानुसार ७ लाख ९१ हजार ५६२ लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानामधून धान्याचे वितरण ४ एप्रिल पासून व्यवस्थित सुरु आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशन कार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे १० लाख ७५९ आहे. या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त धान्य दुकानाद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जात आहे. सार्वजनिक वितरण योजनेंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य म्हणजेच २५ किलो तांदुळ व १० किलो गहू व प्राधान्य कुटूंबाच्या लाभार्थ्यांना तांदुळ ३ रुपये व गहू २ रुपये दराने दिला जातो. त्याचप्रमाणे अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना २० रुपये किलो दराने १ किलो साखर दिली जाते. तेल ,तुरदाळ व चना दाळ जिल्ह्यात उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. ५ हजार क्विंटल डाळीचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले आहे. असे सांगण्यात आले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधून पात्र शिधापत्रिकाधारकांनी नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्यात येत आहे. त्यामुळे आता प्रत्येक अन्न सुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती ५ किलो तांदळाचे नियतन देण्यात आले आहे. हे मोफत धान्य एप्रिल, मे व जून मध्ये त्या त्या महिन्यात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव संसर्गामुळे अधिक वाढत असल्यामुळे आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. या साथरोगावर शासन प्रशासन योग्य पद्धतीने उपाययोजना करत असून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन यंत्रणांना सहकार्य करावे, असे पटोले म्हणाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी साथरोग नियंत्रणासाठी प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
0 comments: