‘लॉकडाऊन’मध्ये अन्नधान्य, भाजीपाल्याअभावी भटक्या कुटुंबींची परवड होत आहे. |
संजय पाटिल : औरंगाबाद : 'लॉकडाऊन' सुरू असल्यामुळे रोजगार बुडालेल्या भटक्या-विमुक्त कुटुंबांची गैरसोय झाली आहे. दोन वेळचे जेवण मिळणेही अनेक कुटुंबांना कठीण झाले आहे. या कुटुंबांना मदत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. त्यावेळी या नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या.
करोना विषाणूच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी 'लॉकडाऊन' जाहीर करण्यात आला. या परिस्थितीत भटके-विमुक्त समाजातील कुटुंबांची फरफट सुरू आहे. हातावर पोट असलेल्या कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे. बेघर आणि बेरोजगार व्यक्तींनी व्यथा मांडली होती. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पालावर जाऊन भटक्या कुटुंबांना अन्नधान्य देऊन मदत केली. महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त संघर्ष समितीने या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पत्र दिल्यानंतर रेड स्वास्तिक सोसायटीचे प्रमुख भगवान राऊत, संस्थेचे अध्यक्ष के. व्ही. गवळी, फुलचंद जैन संचालक यांनी धान्य स्वरूपात चिकलठाणा येथील मसणजोगी, मरग्यामादेवीवाले अशा ३२ कुटुंबाना मदत केली; तसेच धूत हॉस्पिटल परिसरातील दहा कुटुंबाना धान्य वाटप केले. आंतरजातीय विवाहित १३ कुटुंबांना धान्य स्वरूपात मदत केली. यावेळी बी. के. चौधरी, मोहन शिंदे, टी. एस. चव्हाण, दुर्गादास गुढे, स. सो. खंडाळकर, के. ओ. गिर्हे उपस्थित होते. बौद्ध बहुउद्देशीय संस्थेचे डॉ.अरविंद गायकवाड यांच्या शिफारशीवरून कुटुंबांना मदत करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेज मुव्हमेंट या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विश्वदिप करंदीकर आणि पत्रकार स. सो. खंडाळकर यांनीही भटक्या कुटुंबांना मदत केली.
अन्नधान्य, भाजीपाला आणि जेवणाची पाकिटे शहर परिसरात असलेल्या भटक्यांच्या पालावर जाऊन देण्यात आली. सुंदरवाडी येथील मदारी समाजाचे जवळपास २५ कुटुंब, सेव्हन हिल येथील पाथरूट आणि सिकलकरी समाजाची २० कुटुंब, बेंबडे दवाखान्याच्या मागच्या बाजूला वैदुवाडी येथे वैदू, मदारी, डवरी गोसावी यांचे २५ कुटुंब, गेवराई तांडा येथील डवरी गोसाव्याचे २० कुटुंब, जटवाडा, अंबरहिल येथील वडार समाजाचे ३५ कुटुंब यांच्यासह चारशे ते पाचशे कुटुंबांना भरीव मदत करण्यात आली. या कुटुंबांना अन्नधान्याची तातडीने आवश्यकता होती. या नागरिकांनी आपल्या व्यथा सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितल्या.
'लॉकडाऊन' जाहीर झाल्यानंतर दररोज काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या भटक्या कुटुंबांना सर्वाधिक झळ बसली. ही कुटुंब दूरवर राहत असल्याने त्यांच्यापर्यंत सामाजिक संस्था, संघटना यांची मदत पोचली नाही. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी के. ओ. गिऱ्हे, अंबादास रगडे, आर. जी. देठे आणि पुंडलिक धनगर यांनी परिश्रम घेतले. त्यामुळे या कुटुंबांना किमान दोन वेळचे जेवण मिळत आहे.
भटक्या-विमुक्त समाजातील गरजूंना अन्नधान्य आणि इतर मदत करण्यात आली. हाताला काम नसल्याने या कुटुंबांची मोठी अडचण झाली आहे. अशा गरजू लोकांपर्यंत वेळेत मदत पोहोचविण्याची गरज आहे.
0 comments: