Friday, 15 May 2020

नितीन गडकरी : "२० लाख कोटींच्या मदतीपलीकडे उपाययोजना हव्यात" : संजय पाटील

SHARE


नागपूर प्रेस मीडिया : संजय पाटील : 16 मे 2020 : गडकरी म्हणाले, करोना अगदी अनपेक्षितपणे आपल्या सर्वाच्याच आयुष्यात उभा ठाकला अन् त्याने देशाच्याच नव्हे अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेचे गणित बिघडवून टाकले. आज समोर जे चित्र आहे ते फारच भयावह आहे. पण म्हणून जगणे सोडता येणार नाही. हे मान्य की आज अर्थव्यवस्थेचे चाक खूप खोलवर रुतलेले आहे. त्याला बाहेर काढायचे तर केवळ सरकारी प्रयत्नांवर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी सर्वानी सहकार्य करायला हवे, असे आवाहन गडकरी यांनी केले. करोनामुळे विस्कटलेली देशाची आर्थिक घडी नव्याने बसवण्यासाठी काय करावे लागेल हे सांगताना गडकरी म्हणाले, बाजारात रोख तरलता वाढवणे गरजेचे आहे. २० लाख कोटींचे अर्थसाहाय केंद्र सरकारने जाहीर केले आहे. परंतु देशाची लोकसंख्या बघता ते पुरेसे नाही. त्यात नवीन आर्थिक प्रयत्नांची भर पडली पाहिजे. या क्रमात लघू व मध्यम उद्योगांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. यासाठी मी माझ्या भूपृष्ठ वाहतूक खात्यातर्फे येत्या दोन वर्षांत १५ लाख कोटींची कामे सुरू करणार आहे. यासाठी मला सरकारच्या एक नव्या रुपयाची गरज नाही. यासाठी आवश्यक निधी मी विदेशी बँका आणि सार्वजनिक गुंतवणुकीतून उभा करणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचीही मदत घेणार आहे. रेल्वे, हवाई व सागरी वाहतूक ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढली पाहिजे. या प्रयत्नातून आपण नक्कीच सकल उत्पादनाचा दर ५ ते ६ टक्क्यांपर्यंत गाठू शकू, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.


पंतप्रधान पदाच्या मुद्दय़ावरून गडकरींना अनेक प्रश्न विचारले गेले. त्यावर त्यांनी खास त्यांच्या शैलीत उत्तरे देत  रंग भरला. बरेचदा पदावर गेल्यावर माणसे मोठी होतात. तर काही ठिकाणी माणसे त्या पदावर गेल्यावर पदाला महत्त्व मिळते. त्यामुळे आपण आपले काम करत राहिले पाहिजे. सामान्यातला सामान्य माणूस होऊन जगण्यात आणि फुटपाथवरची पाणीपुरी खाण्यात मला अधिक समाधान आहे. जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या वर जाऊन विचार करता आला पाहिजे. महाराष्ट्रात मी माझे मराठीपण जपले आहे. गुजराती म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही, तर गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी के लेल्या कामामुळे ते या पदावर पोहोचले. मी पोस्टर चिटकवणारा, रिक्षात बसून घोषणा करणारा पक्षाचा साधा कार्यकर्ता. माझ्या घरात राजकीय पाश्र्वभूमी नसताना मी येथवर येऊन पोहोचलो. नशीब आणि कर्तृत्वाचा सारा खेळ. तेव्हा जे काम मिळते ते करत राहावे. आयुष्य हा मिळणाऱ्या संधीचा एक खेळ आहे, असे म्हणत गडकरी महालच्या वाडय़ात रमतात. पुण्यातला जसा शनिवारवाडा, तसाच नागपुरात महालचा गडकरी वाडा. याच परिसरात मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे महालशी, महालमधील गर्दीशी आणि तिथल्या प्रत्येक गोष्टीशी माझे भावनिक ऋणानुबंध आहेत.  महालमधला तो वाडा आता पडला आणि नवी इमारत त्या ठिकाणी उभी होत आहे. त्यामुळे ती पूर्ण झाल्यावर मी पुन्हा आपल्या घरटय़ात परत जाणार आहे. शेवटी घर म्हणजे काय असते? महागडय़ा सुखवस्तूंनी घर तयार होत नाही. त्या घरातली माणसे महत्त्वाची असतात. हजारो कोटींच्या संपत्तीत सुख मिळत नाही. कुटुंबीयांचे एकमेकांशी असणाऱ्या भावनिक नात्यांनी घर तयार होते. गडकरींच्या दिलखुलासपणाचे अनेक किस्से आहेत, तो दिलखुलासपणा या मुलाखतीतही रंगला. मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगतो. लोक काय म्हणतील हे मी पाहात नाही. कारण मी महत्त्वाकांक्षी नाही, असे ते म्हणाले



देशातील लघू व मध्यम उद्योगांना गती देण्यासोबतच मासेमारीच्या व्यवसायाला बळ देण्याची गरज आहे. त्यासाठी कोचीच्या पोर्ट ट्रस्टने एक नवीन नाव विकसित केली असून ती देशभरातील कोळी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा विचार आहे. त्यामुळे मासेमारीसाठी खोल समुद्रात जाता येणे शक्य आहे. हे घडले तर हा व्यवसाय पाच लाख कोटींपर्यंत जाऊ शकतो.



यशवंतराव चव्हाण व शरद पवार हीसुद्धा राजकारणातील मोठी नावे आहेत. मात्र, योग्यता असूनही चव्हाण पंतप्रधान होऊ शकले नाहीत. शरद पवारांच्या बाबतीतसुद्धा तेच घडले. हे दोघेही त्या पदावर पोहोचले नाहीत, याचा अर्थ ते लहान आहेत असा होत नाही.



आईचे संस्कार हीच आमची पुंजी. एकदा मित्र सोबत असताना मी घरात एकटय़ाने लाडू खाल्ला. तेव्हा ती रागावली आणि तेव्हापासून वाटून खाण्याची सवय लागली. आजही मी सर्वासोबत जेवतो. कुणाला मदत केली तर ती विसरायला शिक, ही शिकवण देखील तिचीच.


मराठी माणूस सर्वोच्च पदावर का पोहोचला नाही, असा प्रश्न कायम विचारला जातो. मात्र, श्रेष्ठत्व आणि गुणवत्तेचा संबंध भाषेशी नसतो, असे माझे ठाम मत आहे. राजकारणात पद मिळवण्यासाठी मेहनतीसोबतच नशीबही जोरावर असावे लागते. त्याशिवाय सर्वमान्यता मिळणेसुद्धा गरजेचे असते. माझे म्हणाल तर आजवर मला जे मिळाले, त्यात मी पूर्ण समाधानी आहे. मला कोणत्याही पदाची लालसा नाही, असे गडकरी म्हणाले.





SHARE

Author: verified_user

I AM POST GRADUATED FROM THE NAGPUR UNIVERSITY IN JOURNALISM

0 comments: