संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : 30 मे 2020 : नागपूर : उष्णतेची लाट असून पारा ४७ अंशांवर पोहोचला आहे. लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक घरातच आहेत. या पार्श्वभूमीवर वीजग्राहकांना जर अखंडित वीजपुरवठा देण्यास महावितरण अधिकारी व कर्मचारी कमी पडत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. याविषयीचा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.
ऊर्जामंत्र्यांनी विदर्भ व मराठवाडा भागातील विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळाली पाहिजे, यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवावी. अधिकाऱ्यांची-कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता दिसून येत आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, वसुलीचे प्रमाण कमी असलेल्या भागांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन वसुलीवाढीसाठी प्रयत्न करावेत, असे ऊर्जामंत्री यावेळी म्हणाले.
वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होत नसेल तर ही गंभीर बाब आहे. ग्राहकांना अखंडीत वीज देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक सक्रियपणे कामे करावी. ज्या संस्थांकडे ही कामे दिली आहेत, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करा, कामांची गुणवत्ता तपासा आणि कामे संथपणे होत असतील तर संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाका, असे स्पष्ट आदेश ऊर्जामंत्री राऊत यांनी बैठकीत दिले. वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अत्यल्प ठेवण्यासाठी विशेष योजना आखण्याचे आदेशही ऊर्जामंत्र्यांनी दिले. यावेळी महावितरणच्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा ऊर्जामंत्र्यांनी घेतला.
महावितरणमधील कर्मचारी संख्या, रिक्तपदे यांचाही आढावा ऊर्जामंत्र्यांनी घेतला. मागासवर्गीयांना पदोन्नती देण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करावी, असेही आदेश त्यांनी दिले. आर्थिक स्थिती लक्षात घेऊन भरती करण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यानी दिले.
या आढावा बैठकीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक सुनील चव्हाण, महावितरणचे संचालक दिनेशचंद्र साबू, भालचंद्र खंडाईत, कार्यकारी संचालक ब्रिगेडियर पी. के. गंजू, प्रसाद रेशमे, योगेश गडकरी, स्वाती व्यवहारे, नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, हाय पॉवर कमिटीचे अनिल खापर्डे, रमाकांत मेश्राम, अनिल नगरारे तसेच नागपूर, औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध परिमंडलाचे मुख्य अभियंते उपस्थित होते.
वीज बिल देयक केंद्रे सुरू
नागपूर : करोनामुळे महावितरणने नागपूर शहरात मार्चपासून बंद असलेले वीज बिल भरणा केंद्रे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शहरातील काहीच ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात येतील. सुरुवातीच्या टप्प्यात महावितरणकडून काँग्रेसनगर विभागातील ३० वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातील उर्वरित भागात टप्याटप्याने वीजबिल भरणा केंद्र सुरू होतील.
करोनामुळे महावितरणने राज्यातील सर्व वीज बिल भरणा केंद्रे महावितरणने मार्चपासून बंद केली होती. वीजग्राहकांना देयकाची रक्कम भरण्यास अडचण होत असल्याची बाब महावितरणने मनपाला अवगत करून दिली होती. मनपाने कंटेनमेंट झोन वगळता शहरात वीज देयक भरणा केंद्रे सुरू करण्याची परवानगी महावितरणला दिली आहे.
यानुसार, २८ मेपासून केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्देशित केलेल्या मानकांचे पालन करून वीज देयक भरणा केंद्र सुरू करण्याची रीतसर परवानगी दिली आहे. नागपूर शहरातील वीज ग्राहकांनी वीज बिल भरणा केंद्रावर जाऊन थकबाकी असलेल्या रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणच्या नागपूर शहर मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.
0 comments: