संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : 28 जून 2020 : नवी दिल्ली : चीनचे राजदूत सन वेडाँग यांची भारतावर आरोप करणारी मुलाखत प्रसारित केल्याप्रकरणी प्रसारभारतीने प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) या वृत्तसंस्थेशी कराराचा फेरआढावा घेण्याचे ठरवले आहे. प्रसारभारती ही संस्था प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया वृत्तसंस्थेची वर्गणीदार आहे. पीटीआयने दिलेले चिनी राजदुतांच्या मुलाखतीचे वृत्त राष्ट्रविरोधी आणि देशाच्या एकात्मतेस बाधा आणणारे असल्याचा आरोप प्रसारभारतीने केला आहे.
पीटीआय ही देशातील सर्वात जुनी वृत्तसंस्था असून चिनी राजदूतांची मुलाखत प्रसारित केल्याने ती वादात सापडली आहे.
प्रसारभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही पीटीआयला ६.७५ कोटी रुपये वार्षिक वर्गणी देतो. पीटीआयचे प्रमुख संपादक विजय जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून अद्याप कुठला प्रतिसाद मिळालेला नाही. पण पीटीआय वृत्तस्थेने चिनी राजदूताची जी मुलाखत प्रसारित केली त्याचे समर्थन केले आहे.
प्रसारभारती ही आकाशवाणी व दूरदर्शन यांचे नियंत्रण करणारी संस्था असून त्यांनी पीटीआयला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, सार्वजनिक प्रसारक म्हणून वृत्तसंस्थेच्या कृती या देशासाठी सकारात्मक मूल्यांच्या विरोधात आहेत. प्रसारभारती कायदा १९९० च्या कलम १२ मध्ये ज्या मूल्यांचा उल्लेख केला आहे, त्याची वृत्तसंस्थेने पायमल्ली केली आहे. त्यामुळे यापुढे आम्हाला पीटीआयची सेवा सुरू ठेवण्यात स्वारस्य वाटत नाही. प्रसारभारती कायदा कलम १२ २(अ) अन्वये सार्वजनिक सेवा प्रसारकाने त्याची कामे करताना देशाची एकता व अखंडता याला बाधा येईल असे काही करू नये. दरम्यान, याबाबत कोणताही अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रसारभारतीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पीटीआयने सदर मुलाखत प्रसारित करताना त्याच्या संपादनात चुका केल्या, यापूर्वीही अशा चुका त्यांनी केलेल्या आहेत. त्यांनी सार्वजनिक हितास बाधा आणणाऱ्या बातम्या दिल्या आहेत. २०१६-१७ मध्ये आम्ही ९ कोटी वार्षिक वर्गणीचे सुसूत्रीकरण करण्याची मागणी केली होती, पण पीटीआयने आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही २०१७-१८ मध्ये त्यांची वर्गणी २५ टक्के कमी केली. प्रसारभारतीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, पीटीआयच्या मंडळात पत्रकारांचा समावेश असून स्वतंत्र संचालक नाहीत, प्रसारभारतीला त्यात प्रतिनिधित्व नाही. पण प्रसारभारती पीटीआयला सर्वात अधिक पैसे देत आहे.
पीटीआयविषयी..
पीटीआय वृत्तसंस्था देश-परदेशात लोकप्रिय असून त्यांचे ४०० पत्रकार व पाचशे अंशकालीन वार्ताहर आहेत. दिवसाला ते २ हजार बातम्या व २०० छायाचित्रे देतात. अनेक परदेशी वृत्तसंस्थांशी पीटीआयचे परदेशी बातम्यांसाठी करार आहेत. १९४७ मध्ये पीटीआयची नोंदणी झाली व या वृत्तसंस्थेचे काम १९४९ मध्ये सुरू झाले. या वृत्तसंस्थेचे संचालक मंडळ असून मुख्य कार्यकारी अधिकारी रोजचे काम पाहतात.
ठिणगीचे कारण..
गेल्या आठवडय़ात वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींनी चीनचे राजदूत वेडाँग यांची मुलाखत घेतली होती. त्यात वेडाँग यांनी लडाखमधील पेचप्रसंगास तसेच गलवानमधील हिंसाचारात २० भारतीय जवान मृत्युमुखी पडल्याच्या घटनेस भारतच जबाबदार असल्याचा आरोप केला होता.
प्रसारभारतीची भूमिका..
प्रसारभारतीने शनिवारी पीटीआयला एक पत्र पाठवले असून त्यात म्हटले आहे की, तुम्ही प्रसारित केलेल्या बातमीत देशहिताच्या विरोधात आरोप करण्यात आले होते. त्यामुळे देशाच्या प्रादेशिक एकात्मतेला बाधा आली असून आता पीटीआयबरोबरच्या कराराचा फेरआढावा घेण्याची वेळ आली आहे.
पीटीआय म्हणते..
प्रसारभारतीची भूमिका आणि कराराच्या फेरआढाव्याचा विचार अन्याय्य व चुकीचा आहे. चिनी राजदूतांची जी मुलाखत घेतली होती, त्याचा एकतर्फी भाग चिनी दूतावासाने प्रसारित केला. त्याच्या आधारे वृत्तसंस्थेवर एकतर्फी टीका होत आहे.
0 comments: