संजय पाटील : नागपूर प्रेस मीडिया : १४ जुलै २०२० : नागपूर : टाळेबंदीनंतर सुरुवातीला महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस व आरोग्य विभागासह सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शहर व जिल्ह्य़ात करोनावर नियंत्रण मिळवण्यात आले होते. परंतु भाजप नेत्यांनी या काळात महापालिका आयुक्तांसोबत नाहक वाद उकरून विशेष सभा तब्बल पाच दिवस लांबवली. त्यात अधिकारी गुंतल्याने करोनाकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतरच शहरात रुग्णसंख्येचा उद्रेक झाला, असा आरोप नागपूरचे पालकमंत्री व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले, करोनाचे संक्रमण टाळण्यासाठी टाळेबंदीनंतर लगेच विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह इतरही अधिकारी एकत्र आले. सर्वानी प्रभावी नियोजनातून करोनावर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले. रोज उच्चस्तरीय समितीची बैठक होत होती. उणीवांवर चर्चा करून सुधारणा केल्या जात होत्या. शहरात असतांना मीही त्यात सहभागी होत होतो. त्यामुळे मेपर्यंत जिल्ह्य़ात ५४० बाधितच नोंदवले गेले होते. त्यापैकी ३६८ करोनामुक्त झाले.
मृत्यूदरही फार कमी होता. याच दरम्यान भाजप नेत्यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंसह इतर अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. महापालिकेची विशेष सभा पाच दिवसापर्यंत लांबवली. त्यामुळे आरोग्य कर्मचारी महापालिकेतच अडकून पडले. त्यांना साथ नियंत्रणाच्या कामावर जाता आले नाही. परिणामी शहरात करोनाचा उद्रेक झाला. मृत्यू संख्याही वाढत आहे. याला भाजपचे राजकारणच जबाबदार असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
अधिकाऱ्यांवर लांच्छन अयोग्य
करोनाच्या काळात अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर होते. राजकीय मंडळी घरात होती. त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे नागपूरची करोनाची स्थिती नियंत्रित होती. परंतु त्यांनाच आपल्या राजकारणासाठी लांच्छन लावण्याचे काम महापालिकेत सुरू आहे, असा आरोप डॉ. नितीन राऊत यांनी केला.
ऊर्जा खात्याचा कारभार पारदर्शक व गतिमान करणार
ऊर्जा खात्याचा कारभार पारदर्शक व गतिमान करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयांतील सर्वोच्च अधिकाऱ्यांना जास्त अधिकार देऊन तातडीने निर्णयाची मुभा दिली जाईल. जेणेकरून वीज ग्राहकांना चांगल्या सेवा मिळतील. देयकाच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रथमच ऊर्जामंत्री म्हणून मी स्वतचे दोन भ्रमनध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी सार्वजनिक केले आहेत. महावितरणच्या स्थानिक पातळीवरही ग्राहकांच्या देयकाच्या समाधानासाठी यंत्रणा उभारली आहे,
– डॉ. नितीन राऊत
चुकीचे देयक दुरुस्त करणार
वीज देयकाबाबत विविध तक्रारी आहेत. चोवीस तास घरी असल्याने लोकांचा वीज वापर वाढला, हे खरे आहे. मात्र, काही चुकीचे देयक आले असेल. ते दुरुस्त करून दिले जाईल. तीन महिन्याच्या वीज वापराची एकत्रित बेरीज करण्यात आलेली नाही. मार्च ते एप्रिल, एप्रिल ते मे आणि मे ते जून असे स्वतंत्र मोजणी करण्यात आली. त्यानुसार देयक पाठवण्यात आले, असा दावाही डॉ. राऊत यांनी केला.
0 comments: