संजय पाटील: नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहाची बंदीवानांना ठेवण्याची क्षमता १ हजार ८४० आहे. सध्या कारागृहात २ हजार ४७० बंदीवान आहेत. यापैकी सातशे कैद्यांवर केवळ एकच गुन्हा दाखल असून, त्यांचा समावेश कच्च्या कैद्यांमध्ये होते. या बंदीवानांची यादी कारागृह प्रशासनाने तयार केली आहे. शासनाने या कैद्यांना सोडण्याचे आदेश धडकताच या बंदीवानांना सोडण्याची तयारी कारागृह प्रशासनाची आहे.
या कैद्यांना ४५ दिवसांच्या रजेवर सोडण्यात येणार आहे. त्यांना कुठे सोडण्यात आले, ते घरातच राहातात किंवा नाही, काय 'उद्योग' करतात, याची संपूर्ण माहिती कारागृह प्रशासन पोलिस विभागाकडून घेईल. त्यामुळे आगामी काळात पोलिस प्रशासनाच्या डोकेदुखीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण देशात करोनाची दहशत आहे. राज्यातील कारागृहात बंदी असलेल्या कैद्यांनाही या करोनाची लागण होण्याचा धोका लक्षात घेता शासनाने कच्च्या कैद्यांची 'घर वापसी' करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास कच्च्या कैद्यांना 'अच्छे दिन' येण्याची शक्यता आहे. उपराजधानीतील मध्यवर्ती कारागृहातील ७०० बंदीवानांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या बंदीवानांची यादी तयार असून, आता त्यांना बंदीगृहातून सोडण्याची शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा कारागृह प्रशासनाला आहे.
बंदीवानांना घरी सोडणार कसे?
बंदीवानांना पॅरोल व फर्लोवर सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला तर त्यांना घरी कसे सोडावे, हा मोठा प्रश्न कारागृह प्रशासनासमोर ठाकला आहे. संचारबंदीदरम्यान कोणतेही वाहन उपलब्ध नाही. पोलिसांवर आधीच कायदा व सुव्यवस्थेचा भार आहे. पोलिसांकडे असलेल्या वाहनांची संख्याही कमी आहेत. त्यामुळे पोलिसांकडून बंदीवानांना सोडण्याची वाहने मिळण्याची शक्यता धुसर आहे. अशावेळी महापालिका अथवा राज्य परिवहन महामंडळाकडून बस उपलब्ध होऊ शकतात. मात्र, वाहनांचा इंधन खर्च कोण करणार, याबाबतही संभ्रम असल्याची माहिती आहे.
नागपूर कारागृहातून मास्कचा पुरवठा
करोनामुळे अचानकपणे मास्कची मागणी वाढल्याने शहरात मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही कमी भरुन काढण्यासाठी कारागृहातील २६ बंदीवान मास्कची निर्मिती करीत आहेत. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून विदर्भातील अनेक कारागृहे व प्रशासकीय कार्यालयांना मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे. भंडारा कारागृहाला २००, चंद्रपूर ५००, वाशीम ३५०, बुलडाणा ५००, वर्धा ५००, गडचिरोली १००, नागपूर कारागृह ५०००, अमरावती २०००, मोर्शीतील खुले कारागृह ५००, नागपुरातील जिल्हा व सत्र न्यायालय १५०, मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ ३००, समाज कल्याण विभाग ३५०, आदिवासी विकास विभाग १००, न्यायवैद्यक प्रयोगशाळा ३००, शासकीय मुद्रणालय १५०, दारूबंदी विभाग ५००, सावनेरमधील ग्रामीण रुग्णालय ३००, हेडगेवार रक्तपेढी १५०, आरोपी सेल ५००, कोषागारमध्ये नागपूर कारागृहातून १५० मास्क पुरविण्यात आले आहेत.
पोलिस विभाग, महापालिकेला हवे १६ हजार मास्क
शहरभर तैनात पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठी स्थानिक प्रशासनाने नागपूर मध्यवर्ती कारागृहाला प्रत्येकी आठ हजार मास्कची मागणी केली आहे. त्यानुसार कारागृहात मास्कची निर्मिती करण्यात येत आहे. आगामी काही दिवसांत पोलिस विभाग व महापालिकेच्या मागणीनुसार, मास्कचा पुरवठा करण्यात येईल. याशिवाय पोलिस रुग्णालयानेही एक हजार मास्कची मागणी केली आहे.
मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना करोनाची लागण होऊ नये, यासाठी संपूर्ण काळजी घेण्यात येत आहे. संपूर्ण कारागृहाचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक जवानाला सॅनिटायझर देण्यात आले आहे. कारागृहातून आत व बाहेर जातानाही कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. ७०० कच्च्या कैद्यांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रशासनाने आदेश दिल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्यात येईल. मास्कची मागणी वाढली असून, ते तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, नागपूर